नंदुरबार – नगरपालिकेच्या नूतन इमारतीच्या उभारणीत झालेला भ्रष्टाचार दडपण्यासाठीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत उद्घाटनाचा कार्यक्रम घेतला जात असून चौकशी दडपण्याचे हे षडयंत्र आहे; असा सनसनाटी आरोप भारतीय जनता पार्टीचे माजी आमदार शिरीष चौधरी यांनी पत्रकाद्वारे केला आहे.
नंदुरबार नगरपालिका नूतन इमारतीचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत होणार आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी हे पत्रक काढून आरोप केले आहेत. भारतीय जनता पार्टीचे माजी आमदार शिरीष चौधरी यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, पालिकेच्या नवीन वास्तूत इलेक्ट्रिफिकेशनच्या कामांसंदर्भात ३ कोटी रुपयांची ई-निविदा काढण्यात आली होती. पालिका विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी नवीन वास्तूस भेट दिली असता, निविदेची कामे पूर्ण झालेली होती. ही कामे पूर्ण झाली असताना पालिकेतर्फे निविदा काढली होती. त्यावर झालेल्या तक्रारींची दखल घेत जिल्हाधिकारी यांनी चौकशी केली असता 22 लाख रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे त्यांना निदर्शनास आले. त्यावर त्यांनी कारवाई करण्याचे आदेश दिले. असे असूनही जबाबदार अधिकाऱ्यांनी मात्र अद्याप पर्यंत त्यावर कोणतीही कारवाई केलेली नाही. म्हणून याप्रकरणी नगरसेवक गौरव चौधरी यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. आता हे प्रकरण न्यायालय स्तरावर चालू आहे, असे नमूद करून माजी आमदार शिरीष चौधरी यांनी पुढे म्हटले आहे की, न्यायालयाच्या निर्णयाची वाट न पाहता पुन्हा निविदा काढण्यात आली आणि आता प्रकरणाची चौकशी सुरू असताना नूतन वास्तूच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्र्यांना आमंत्रण देऊन चौकशी करणाऱ्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न होत आहे.
Namskar sir