नटराज व विज्ञान
उत्पत्ती स्थिती व लयाची देवता म्हणजे शिव होय. शिवाच्या दोन अवस्था मानल्या आहेत. त्यांतील एक समाधी अवस्था आणि दुसरी म्हणजे तांडव किंवा लास्य नृत्य अवस्था. समाधी अवस्था, म्हणजे निर्गुण अवस्था आणि नृत्यावस्था म्हणजे सगुण अवस्था.नटराज या रूपात शिवाने नाट्यकला प्रवर्तित केली, अशी पारंपरिक धारणा आहे. ब्रह्मांड ही नटराजाची नृत्यशाला आहे.जेव्हा त्याचे नृत्य चालू होते, तेव्हा त्या नृत्याच्या झंकाराने सर्व विश्वव्यापाराला गती मिळते आणि जेव्हा त्याचे नृत्य विराम पावते, तेव्हा हे चराचर विश्व आपल्यात सामावून घेऊन तो एकटाच आत्मानंदात निमग्न होऊन रहातो’, अशी नटराज कल्पनेमागची भूमिका आहे. थोडक्यात नटराज हे ईश्वराच्या सकल क्रियाकलापाचे प्रतीरूप आहे. नटराजाचे नृत्य हे सृष्टी, स्थिती, संहार, तिरोभाव (मायेचे आवरण) आणि अनुग्रह (मायेतून बाहेर पडण्यासाठी कृपा) या पाच ईश्वरी क्रियांचे द्योतक मानले जाते. अमेरिकी भौतिक शास्त्रज्ञ आणि दार्शनिक फ्रिटजॉफ कॅपरा यांनी भगवान शिवाच्या नटराज रूपातील तांडव नृत्याचे परमाणूची उत्पत्ती आणि विनाश यांच्याशी संबंध असल्याचे म्हटले आहे. कॅपरा यांच्या वर्ष १९७२ मध्ये प्रकाशित ‘मॅन करेंट्स ऑफ मॉडर्न थॉट’ या पुस्तकातील ‘द डान्स ऑफ शिव’ या लेखामध्ये त्यांनी याविषयी लिहिले आहे. त्यांनी ८ जून २००४ मध्ये जिनेव्हा येथील ‘युरोपियन सेंटर फॉर रिसर्च इन पार्टिकल फिजिक्स’मध्ये तांडव नृत्य करणार्या नटराजच्या उंच मूर्तीचे अनावरण केले होते. शिवाच्या नृत्याची २ रूपे आहेत. एक आहे लास्य. ज्याला नृत्यामध्ये कोमल रूप म्हटले जाते. दुसरे आहे तांडव, जो विनाश दर्शवतो. भगवान शिवाचे नृत्य सर्जन आणि विनाश दर्शवतो. तांडव नृत्य ब्रह्मांडामधील मूल कणांच्या वर-खाली होण्याच्या प्रक्रियेचे दर्शक आहे. तांडव करणार्या नटराजाच्या पाठीमागील चक्र ब्रह्मांडाचे प्रतीक आहे. त्याच्या डाव्या हातातील डमरू परमाणूची उत्पत्ती, उजव्या हातातील अग्नी परमाणूचा विनाश दर्शवते. अभय मुद्रेचा हात आपली सुरक्षा आणि दुसरा हात वरदान देणारा आहे.
– डॉ०. पी. एस. महाजन, संभाजीनगर