नवरदेव-नवरीचे असेही शिवप्रेम ! ‘आधी पुजन शिवरायांचे’; म्हणत आधी केले पुजन, मगच गळ्यात टाकली माळ

नंदुरबार (प्रतिनिधी) – नवरदेव नवरी म्हटले की, मिरवणूक केव्हा संपते आणि एकमेकाच्या गळ्यात माळ केव्हा पडते, याची घाई झालेले तरुण जोडपे डोळ्यासमोर येते. परंतु ‘आधी पूजन शिवरायांचे’ असे म्हणत वरात निघालेली असताना आधी शिवपूजन करून मगच बोहल्यावर चढणारे नवदांपत्य शिवप्रेमींना पाहायला मिळाले.
झाले असे की, नंदुरबार येथील गवळीवाडा भागातील संतोष देमाजी घुगरे यांची सुकन्या चि. सौं. का. भाग्यश्री आणि धुळे मोगलाई येथील राजेंद्र बिडकर यांचे चिरंजीव विवेक यांचा विवाह आज दिनांक 19 फेब्रुवारी 2022 रोजी  होता. नियोजित वेळेप्रमाणे त्यांची मिरवणूक निघाली तथापि उपवर वधु वरांनी बोहल्यावर चढण्यापूर्वी आणि अक्षदा पडण्यापूर्वी स्वतंत्र वेळ काढत छत्रपती शिवरायांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन शिवपुजन केले.   शहीद शिरीषकुमार मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष महादू हिरणवाळे यांच्या संकल्पनेतून वधू-वरांच्या हस्ते हे शिव पूजन करण्यात आले. याप्रसंगी बालवीर चौकात शिवराज्याभिषेक सोहळ्याची प्रतिमा आणि भगवे ध्वज यांनी परिसर सजविण्यात आला होता. ध्वनिक्षेपकावर छत्रपती शिवरायांचे पोवाडे चैतन्य निर्माण करीत होते. शिवपूजन कार्यक्रमास मंडळाचे ज्येष्ठ सल्लागार सेवानिवृत्त शिक्षक जी. एस. गवळी, संस्थापक अध्यक्ष महादू हिरणवाळे, धुळे येथील संदीप बिडकर, गणेश बिडकर, बोरविहीर येथील कीटकनाशक प्रतिनिधी राजेन्‍द्र घटी ,  प्रा. एकनाथ हिरणवाळे, ईश्वर घुगरे, साई घुगरे, डॉ.भूषण पालकडे, प्रफुल्ल राजपूत, सिद्धेश नागापुरे  यांच्यासह गवळी समाजातील महिला शालेय विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!