नंदुरबार :- नवापूर तालुक्यातील घोडजामणे येथील जनावरांमध्ये ‘लम्पी स्किन डिसीज’ या साथरोगाचा निष्कर्ष होकारार्थी आला आहे. यामुळे सदर रोगाचा प्रसार जिल्ह्यातील इतर ठिकाणी होऊ नये, यासाठी पशुपालकांनी दक्ष रहावे व त्यांच्याकडे असलेल्या पशुंना साथीच्या रोगापासून सुरक्षित ठेवावे; असे आवाहन नंदुरबार जिल्ह्याचे पशुसंवर्धन उपआयुक्त यांनी केले आहे.
काही महिन्यांपूर्वीच नवापूर तालुक्यात बर्ड फ्ल्यू ने थैमान घातले होते. त्यात लाखोच्या संख्येने कोंबड्यांचा बळी गेला होता. आता गुरांवर साथीचे संकट आल्याने पशूपालक चिंतेत पडले आहेत. शासनाने दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, ‘लम्पी स्कीन डिसीज’ हा प्रामुख्याने गाई व म्हशींना होणारा विषाणूजन्य साथीचा आजार असून देवी विषाणू गटातील कॅप्रिपॉक्स विषाणूमुळे हा आजार होतो. शेळ्या व मेढ्यांना हा आजार होत नाही. विदेशी वंशाच्या (पाठीवर वशिंड नसलेल्या जसे जर्सी होल्स्टेन इत्यादी ) आणि संकरीत गायींमध्ये देशी वंशांच्या गायीपेक्षा पाठीवर वशिंड असलेल्या भारतीय जातीत रोगबाधेचे प्रमाण अधिक असते. हा रोग सर्व वयोगटातील नर व मादी जनावरात आढळतो. मात्र लहान वासरात प्रौढ जनावरांच्या तुलनेत रोगबाधेचे प्रमाण अधिक असते.
आजाराची लक्षणे: बाधित जनावरांमध्ये या आजाराचा सुप्तकाळ साधारणपणे 2 ते 5 आठवडे एवढा असुन या आजारामध्ये प्रथम जनावरांच्या डोळ्यातून व नाकातुन पाणी येते. लसिकाग्रंथीना सुज येणे, भरपूर ताप, दुग्ध उत्पादन कमी होते, चारा खाणे, पाणी पिणे कमी होते. त्वचेवर हळूहळू 10-50 मिमी व्यासाच्या गाठी प्रामुख्याने डोके, मान, पाय, मायांग, कास, इत्यादी भागात येतात. काही वेळा तोंड, नाक व डोळ्यात व्रण निर्माण होतात. तोंडातील व्रणामुळे आजारी जनावरांना चारा चघळण्यास त्रास होतो. डोळ्यातील व्रणामुळे चिपडे येतात, दृष्टी बाधित होते.या आजाराच्या प्रादुर्भावामुळे फुफ्फुसदाह किंवा कासदाह आजाराची बाधा पशूंमध्ये होऊ शकते. रक्तातील पांढऱ्या पेशी व प्लेटलेटची संख्या कमी होते. पायावर सूज येवून काही जनावरे लंगडतात.
उष्ण व दमट हवामानात कीटकांची वाढ अधिक प्रमाणात होते. उन्हाळ्यात अधिक प्रमाणात आढळतो, मात्र हिवाळयात थंड वातावरणामध्ये या रोगाचा प्रसार कमी प्रमाणात होतो. लम्पी स्कीन डिसिज या आजाराचा रोग दर 2-45 टक्के (सर्वसामान्यपणे 10-20 टक्के) तर मृत्यदर 1-5 टक्के पर्यंत आढळून येतो.
या रोगामुळे जनावरांच्या मरतुकीचे प्रमाण नगण्य असले तरी, बाधित जनावरे अशक्त होत जातात. दूध उत्पादनात मोठी घट होऊन त्यांची कार्यक्षमता खालावते. काही वेळा बाधित जनावरांचा गर्भपात होत असून प्रजननक्षमतासुध्दा घटते. या रोगामुळे त्वचा खराब होत असल्याने जनावरे विकृत दिसतात. हा रोगाचा प्रसार विषाणूचा संसर्ग निरोगी व बाधित जनावरे यांच्यातील प्रत्यक्ष स्पर्शाने तसेच चावणाऱ्या माश्या (स्टोमोक्सीस), डास, गोचीड, चिलटे यांच्यामुळे होतो.
लम्पी स्कीन डिसीजच्या रोगनियंत्रणासाठी गोठा व परिसर नियमित स्वच्छ ठेवावा. परिसरात पाणी साठणार नाही यांची दक्षता घ्यावी. किटकनाशक औषधांची जनावराच्या अंगावर व गोठ्यात फवारणी करावी. बाधित जनावरांची तपासणी करणाऱ्या पशुवैद्यकानी योग्य पोशाख परिधान करावा. तपासणी झाल्यानंतर हात डेटॉल किंवा अल्कोहोल मिश्रित सॅनीटायझरने धुवून घ्यावेत. कपडे व फूटवेयर गरम पाण्यात धुवून निर्जतुक करावेत. जनावरांच्या संपर्कात आलेले साहित्य, वाहन, परिसर इत्यादी निर्जंतुक करावा. सद्यस्थितीत यावर लस उपलब्ध नाही, मात्र शेळ्यात देवीवर वापरण्यात येणारी लस वापरुन हा रोग नियंत्रणात आणता येवू शकतो. तसेच आजारी जनावरांच्या संपर्कातील जनावराना आयव्हरमेक्टीनचे इंजेक्शन दिल्यास किटकनियंत्रण होवून रोगप्रसारात आळा बसू शकतो.