नंदुरबार – महाराष्ट्र गुजरात सीमेवर नवापुर (बेडकीपाडा) येथील आरटीओ चेकपोस्टवर बसविण्यात आलेल्या वजन काटा (वे ब्रिज) माध्यमातू प्रत्येक ट्रक मागे तब्बल चारशे ते साडे चारशे किलोंचे वाढीव वजन दाखवले जात असून हा वे ब्रिज चालवणारी ‘सदभाव’ कंपनी ट्रक मालक आणि चालकांची सर्रास लुट करीत आहे. या लुटमारी मुुळे त्रासलेल्या गुजरात मधील काही बड्या ट्रान्सपोर्ट वाल्यांनी नंदुरबार जिल्हा प्रशासन पासून थेट दिल्लीत रस्ते वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्यापर्यंत तक्रारी करीत धाव घेतली आहे.
नवापुर येथील बेडकीपाडा चेकपोस्टवर सुरु असलेली लुट थांबवून वाहनधारकांना न्याय द्यावा, अशी मागणी करीत या ट्रान्सपोर्ट चालकांनी नंदुरबार येथे पत्रकार परिषदेत आपल्या व्यथा कथन केल्या. जीवामाई गोठावीया (त्रीशूल ट्रान्सपोर्ट), सुभानभाई आगारीया (श्रीशुल रोडलाईन), केवलभाई खानकी (बालाजी ग्रुप ऑफ ट्रान्सपोर्ट, पोरबंदर), रुडाभाई (निर्देष ट्रान्सपोर्ट) यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
दरम्यान नंदुरबार जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, नंदुरबार उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांना तसेच राज्याचे मुख्यमंत्री व केंद्रीय परिवहन मंत्री नितिन गडकरी यांना लेखी तक्रारी त्यांनी पाठवल्या आहेत. त्यात म्हटले आहे की नवापूर चेक पोस्ट नाक्यावर बसविण्यात आलेल्या वजन काटा (वे ब्रिज) मध्ये प्रत्येक ट्रक मागे तब्बल चारशे ते साडे चारशे किलोंनी वजन वाढत असते. यामुळे ट्रक मालक आणि चालकांना दंडापोटी पन्नास हजारांहून अधिकचा फटका बसत आहे. सदरचा ट्रक याच चेक पोस्ट नजीकच्या कुठल्याही खाजगी वे ब्रिजवर मापन केल्यास त्याचे वजन सदभावच्या वजनकाट्या पेक्षा चारशे किलोने कमी येते आहे. ही बाब अतिशय संशयास्पद असून यामुळे याठिकाणी सर्रास तुट होत असल्याची भावना ट्रक मालक आणि चालकांची झाली आहे.
मुळातच आम्ही ट्रान्सपोर्ट क्षेत्रातील सर्व प्रतिष्ठीत व्यावसायीक असल्याने वाहनांमध्ये किती माल क्षमता असावी याची आम्हाला जाणीव आहे. आमचे वाहन अडवल्यानंतर आम्ही या सदभाव कंपनीच्या कर्मचाऱ्यांसमवेत नियमानुसार फोनवर पंधरा मिनिटीच्या आत हरकत घेतली. मात्र आमच्या हरकती कडे दुर्लक्ष करत त्यांनी आपली दंडात्मक कारवाई कायम ठेवली. मुळात आजही आमची मागणी आहे कि त्यांच्या ताब्यात सीसीटीव्ही निगराणी खाली असलेल्या आमच्या वाहनांची त्यांनी कोणत्याही इतर खाजगी वे ब्रिजमधून वजन मोजणी करून घ्यावी. जर ती जास्त निघाल्यास आम्ही दंडात्मक रक्कम भरण्यास पात्र राहू. मात्र सदभाव कंपनी आणि आरटीओचे अधिकारी आमच्या या न्यायीक मागणीकडे सपशेल दुर्लक्ष करत आहे, असे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले तसेच निवेदनातही नमूद केले आहे.
पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की, मुळातच देशात वन नेशन वन टॅक्स लागू आहे. गुजरात सरकारने त्यांच्या राज्यातील सर्व आरटीओच्या चेकपोस्ट देखील बंद केल्या आहेत. मग महाराष्ट्रातच या चेकपोस्टचा अट्टाहास का ? ही सुट कोणासाठी ? वाहनांची तपासणी व्हावी, यात कुठलेही दुमत नाही. मात्र एखाद्या खाजगी कंपनीला बसवून तिच्या मार्फत दिला जाणारा हा सर्व संशायस्पद त्रास व्यावसायीकांसाठी अतिशय वेदनादायक आहे. त्यामुळे या अन्यायकारी कारभाराच्या विरोधात आम्ही सर्व गुजरात राज्यातील वाहतुकदार न्यायालयात जाण्याची तयारी करत असून या अन्यायाच्या विरोधात आम्ही आंदोलनाबाबत आम्ही विचाराधीन आहोत. येत्या एक दोन दिवसात यावर प्रशासनाने भुमिका न घेतल्यास आम्ही नवापुर येथील बेडकी चेकपोस्टवरच आंदोलन करणार आहोत. या ठिकाणी कशी तुट होते आणि काय प्रकार होत आहेत ? वाहनधारकांची कशी लुट केली जात आहे ? याचा आम्ही आंदोलन स्थळी पुराव्यानिशी भांडाफोड देखील करू, असा इशारा या ट्रान्सपोर्ट चालकांनी दिला आहे.