निकालाची उत्सुकता शिगेला; ‘एक्झिट पोल’चा कल ‘विकासाच्या गॅरंटी’कडे; मात्र दोन्ही उमेदवार आतषबाजीच्या फुल तयारीत

 

नंदुरबार – मतमोजणीला अवघे काही तास शिल्लक राहिले असून नंदुरबार लोकसभा मतदार संघ महायुतीच्या उमेदवार खा. डॉ. हीना गावित यांच्या विकास कामांच्या गॅरंटीवर शिक्कामोर्तब करणार? की, महाविकास आघाडीचे उमेदवार अॅड. गोवाल पाडवी यांच्या ‘आदिवासी हक्क बचाव’ नाऱ्याला कौल देणार? याविषयीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दरम्यान मतमोजणी प्रक्रियेची प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे.

निकाल उद्या दिनांक 4 जून रोजी घोषित होणार असला तरी दोन्ही उमेदवारांच्या समर्थकांनी मात्र जल्लोषाची संपूर्ण तयारी करून ठेवली आहे. जवळपास सर्व एक्झिट पोल वरील अंदाज भाजपा उमेदवार डॉक्टर हिना गावित यांच्या विजयावर शिक्कामोर्तब करणारे आहेत. यामुळे आतापासूनच भावी मंत्री असा उल्लेख असलेले डॉक्टर हिना गावित यांचे अभिनंदन करणारे फलक झळकू लागले आहेत. असे असले तरी काँग्रेस समर्थक सुद्धा आतषबाजी करण्याच्या फुल तयारीत आहेत.

उद्या दिनांक 4 जून 2024 रोजी होणाऱ्या मतमोजणीतून काय निकाल लागणार ? नंदुरबार लोकसभा मतदार संघात महायुतीच्या उमेदवार खा. डॉ. हीना गावित व महाविकास आघाडीचे उमेदवार अॅड. गोवाल पाडवी यांच्यात सोशल मीडियावर रंगलेली काट्याची लढत मतपेटीतूनही पाहायला मिळेल काय? याची प्रचंड उत्सुकता निर्माण झाली असून याची स्पष्टता व्हायला आता अवघे काही तास उरले आहेत. नंदुरबार लोकसभा मतदारसंघात एकूण 11 उमेदवार रिंगणात होते. प्रत्यक्षात मात्र महायुतीच्या उमेदवार डॉक्टर हिना गावित आणि महाविकास आघाडीचे एडवोकेट गोवाल पाडवी यांच्यात म्हणजेच भाजपा विरुद्ध काँग्रेस अशी लढाई रंगली. नंदुरबार लोकसभा मतदारसंघात एकूण मतदार संख्या 19 लाख 70 हजार 327 आहे. त्यापैकी 13 लाख 92 हजार 710 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. एकंदरीत 71 टक्के मतदान झालेले असल्यामुळे वाढलेली टक्केवारी कोणासाठी? हा प्रश्न सध्या चर्चेत आहे.

*ही आहे उत्सुकता*

भाजपाच्या उमेदवार डॉक्टर हिना गावित यांनी गावागावात पोचवलेल्या मोदी सरकारच्या योजनांचे लाभ, त्यांचे पिता आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित आणि भगिनी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित यांच्याही माध्यमातून झालेली विकास कामे यावर आधारित सकारात्मक प्रचार महायुतीकडून जोरदारपणे होताना दिसला होता. डॉक्टर हिना गावित यांच्या त्या विकास कामांच्या ‘गॅरंटी’वर मतदारांनी शिक्कामोर्तब केलंय का? हे उद्याच्या मतमोजणीतून स्पष्ट होणार आहे. दरम्यान संपूर्ण निवडणूक काळात काँग्रेस उमेदवार गोवाल पाडवी यांच्या बाजूने आदिवासींचे आरक्षण, संविधान बचाओ, मणिपूर प्रकरण यावर आधारित जोरदार प्रचार झाला होता. त्यामुळे भाजपाकडे झुकलेल्या आदिवासी मतपेढीचे विभाजन करण्यात काँग्रेसला यश आलंय का? हे उद्याच्या मतमोजणीतून स्पष्ट होईल.

*प्रशासन जय्यत तयारीत*

यापार्श्वभूमीवर प्रशासनातर्फे तयारी पूर्ण करण्यात आली असून सुमारे ६०० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. एका मतदार संघासाठी १४ याप्रमाणे काही मतदार संघांसाठी ८४ टेबलांवर मतमोजणी होणार असून २५ फेऱ्यांमध्ये सदर प्रक्रिया पार पडणार असून २ ते ३ वाजेपर्यंत अंतिम निकाल हाती येण्याची शक्यता आहे. यासाठी मतमोजणी कर्मचारी सकाळी ६ वाजता मतमोजणी केंद्रात दाखल होणार असून ८ वाजता पोस्टल बॅलेट मतदान मोजणी तर ८.३० वाजता प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होणार आहे. मतमोजणी केंद्र भोवतालचा संपूर्ण परिसर पोलीस यंत्रणेने ताब्यात घेतला असून कडक बंदोबस्त लावण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर काल केंद्रीय निवडणूक आयोगाने नेमणूक केलेले निवडणूक निरीक्षक डॉ. विश्वनाथ आणि दुष्यंत कुमार यांनी मतमोजणी कक्षाची तसेच परिसराची पाहणी केली. त्यांच्यासोबत अपर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रमोद भामरे, उपविभागीय पोलिस अधिकारी संजय महाजन, नंदुरबार शहर पोलिस निरीक्षक वासुदेव देसले आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!