निर्धार ! शिवजयंती दणक्यात साजरी करणारच;  शिवप्रेमींनी मोटरसायकल रॅली, शोभायात्रेचेही केले आयोजन

नंदुरबार –  यंदा काहीही झाले तरी छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त मिरवणूक काढणारच असा निर्धार करीत नंदुरबार शहरातील समस्त शिवप्रेमींनी मोटर सायकल रॅली आणि सवाद्य मिरवणूक काढण्याचे नियोजन केले आहे. आज 17 मार्च रोजी दुपारी विविध संघटनांच्या झालेल्या संयुक्त बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
शिवजयंती या पार्श्वभूमीवर झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत शिवजयंती मिरवणुकीससह साजरी करण्याविषयी स्पष्ट ताना झाल्याच्या पार्श्वभूमीवर विविध संघटनेच्या शिवप्रेमींनी हा निर्णय घेतला.
कधी कोरोना कालावधीमुळे कधी कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नांमुळे गणपती मिरवणूक असो की छत्रपती शिवाजी महाराज जयंतीची मिरवणूक असो अडवणूक केली जाते. हिंदू सणऊत्सव जाहीरपणे साजरे करण्यावर अप्रत्यक्षपणे बंधने लादून ते थांबवणे अन्यायकारकच आहे; अशा अर्थाची भावना उपस्थित अनेकांनी व्यक्त केली. सलग दोन वर्षांपासून थांबलेली शिवजयंती मिरवणूक यंदा काढायचीच असा निर्धार करण्यात आला. यासाठी 11 जणांचा समावेश असलेली श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती गठीत करण्यात आली.
याबाबत समितीने दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, आज दिनांक १७/०३/२०२२ रोजी सकाळी ठिक ११ वाजता मोठा मारुती मंदिर येथे नंदुरबार शहरातील सर्व समाज प्रमुख, व्यायाम शाळा अध्यक्ष व नगर सेवक यांची छत्रपती श्री. शिवाजी महाराज जयंती साजरी करण्याबाबत बैठक घेण्यात आली. या बैठकीत सर्व संमतीने उत्सव समिती स्थापन करण्यात आली असून दिनांक २० मार्च रोजी मोटारसायकल रॅली व २१ मार्च रोजी सवाद्य मिरवणुक (रॅली काढण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. मोटर सायकल रॅली- दिनांक २० मार्च सायंकाळी ४.०० वाजता ग्यारा मिल कंपाऊंड पासून सुरुवात होऊन संभाजी नगर व्यायाम शाळा, सिंधी कॉलनी, मोदी ग्राऊंड, करण चौफुली, कोरीट नाका, गिरीविहार गेट, उड्डाणपुल, गांधी पुतळा, महाराष्ट्र व्यायाम शाळा, सोनार खुंट, जळका बाजार, दादा गणपती, मोठा मारुती आणि श्री छत्रपती शिवाजी नाटय मंदिर येथे सांगता केली जाईल.
दिनांक २१ मार्चला सायंकाळी ४ वाजता सर्व व्यायामशाळांच्या सहभागाने माळीवाडा येथून सवाद्य पायी मिरवणूकीला सुरुवात होउन, महाराष्ट्र व्यायाम शाळा सोनार खुंट जळका बाजार दादा गणपती मोठा मारुती – नाटय मंदिर दिनदयाळ चौक जूनी नगर पालीका येथे छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या मुर्तीचे पुजन करून सांगता केली जाईल.
श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समितीमधे  केतन दिलीपसिंह रघुवंशी, पंडीत कौतीक माळी, अर्जुन सुधाकर मराठे, संजु भाऊ रगड़े, नरेंद्र परशुराम पाटील, विरेंद्र दादा अहीरे, सागर कृष्णा चौधरी, कुणाल विनोद सोनार, भूषण पुंडलीक पाटील, युवराज राजपुत, खुशाल चौधरी यांचा समावेश आहे.
शांतता बैठकीत तापला परवानगीचा मुद्दा
 
दरम्यान याआधी म्हणजे 16 मार्च 2022 रोजी होळी, शिवजयंती व मुस्लिम बांधवांच्या सण,ऊत्सवांच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात शांतता समितीच्या सदस्यांची बैठक नंदुरबार जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक विजय पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. नंदुरबार नगरपालिकेचे प्रभारी नगराध्यक्ष कुणाल वसावे, नंदुरबार उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार अमृतकर, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण कुमार खेडकर, उपनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नरेंद्र भदाणे, शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक निलेश वाघ तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राहुल पवार व्यासपीठावर होते. तसेच नंदुरबार शहरातील शांतता समितीचे सदस्यही या बैठकीस उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात शिवजयंतीची परवानगी घ्यावी लागते ही दुर्दैवाची बाब आहे असे मत याप्रसंगी भाजपा अल्पसंख्यांक आघाडीचे प्रमुख लियाकत बागवान यांनी मांडले व महाराष्ट्र सरकारने उत्सवाला सूट द्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली. जर असे वाटत असेल तर नरेंद्र मोदी यांच्या कडून परवानगी घेऊन या; अशी खोचक टिपणी त्यावर नगरसेवक तथा माजी उपनगराध्यक्ष परवेज खान करामत खान यांनी व्यक्त करताच अन्य काही सदस्यांनी हरकत घेतली. हिंदु आणि मुस्लिम दोन्ही समाज बांधवांच्या सण-उत्सवांना मागील दोन वर्षात साजरे करता आलेले नाही म्हणून यंदा बंदी न आणता दोन्ही कडच्या धार्मिक उत्सवांना डीजेसह परवानगी द्यावी; असेही मत अन्य सदस्यांनी मांडले. यावर उपस्थितांच्या प्रश्नांना उत्तरे देताना अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक विजय पवार यांनी सांगितले की, प्रशासनाच्या मार्गदर्शक सूचना अद्याप प्राप्त झालेल्या नाहीत. त्यासंबंधीचे आदेश प्राप्त झाल्यानंतरच यावर निर्णय घेण्यात येईल. तथापि कोरोना नियमांचे व प्रशासनाने दिलेल्या आदेशांचे पालन करूनच आगामी सण-उत्सव साजरे करावे, एकमेकांच्या भावनांचा आदर करून सौहार्द्र टिकवून शांततेत साजरे करून कायदा-सुव्यवस्था व प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!