नंदुरबार : केंद्र सरकारच्या युवा आणि खेल मंत्रालयांतर्गत येथील नेहरू युवा केंद्र संघटनच्या वतीने महात्मा गांधी जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत स्वच्छ परिसराचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयापासून सुरू झालेल्या या अभियानाला जिल्हाधिकारी श्रीमती खत्री यांनी हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ केला.
यावेळी नेहरु युवा केंद्रातील स्वयंसेवकांनी जिल्हाधिकारी कार्यालय तसेच कर्मचारी वसाहतीच्या आवारातील परिसरात स्वच्छता केली. यावेळी जिल्हाधिकारी मनीषा खत्री, नेहरू युवा केंद्राचे युवा अधिकारी अर्श कौशिक, शिक्षण विस्तार अधिकारी जयंत चौरे, सुभाष शिंदे तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्रीमती खत्री म्हणाल्या की, तरुणांनी घर आणि परिसरातील स्वच्छतेला प्राधान्य द्यावे, आपला परिसर नेहमी स्वच्छ ठेवावा. त्यासाठी स्वत: तसेच इतरांना प्रेरीत करुन स्वच्छतेचे महत्व पटवून द्यावे. स्वच्छते विषयी जागृतता निर्माण करावी, तसेच या स्वच्छता अभियानात युवा तसेच नागरिकांनी सहभाग घेण्याचे आवाहन त्यांनी केले. नेहरू युवा केंद्राचे युवा अधिकारी कौशिक यांनी केंद्र सरकारच्या निर्देशानुसार स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत 31 ऑक्टोबर 2021 पर्यंत जिल्ह्यात मुर्ती, पुतळे तसेच विविध शहराच्या विविध भागात स्वच्छता मोहिम राबविली जाणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
यावेळी या अभियानात नेहरू युवा केंद्रातील स्वयंसेवक, संस्कृती बहुउद्देशिय सेवा मंडळाच्या सचिव सुजाता साळवे, मिलिंद धोंदरे, लोककल्याण बहुउद्देशिय संस्थाचे पंकज ठाकरे सहभागी झाले होते.
0000