नंदुरबार – वकिलांना पथकर माफ करावा, यासह विविध मागण्यांसाठी नोटरी संशोधन अधिनियम 2021 या सुधारणा बिलाच्या संदर्भाने महाराष्ट्र आणि गोवा नोटरी असोसिएशनने दिनांक 14 डिसेंबर 2021 रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर एक दिवस बंद पुकारला असून नोटरी कामकाज बंद ठेवण्यात येणार आहे.
केंद्र सरकारचा सध्या अस्तित्वात असलेल्या 1952 च्या नोटरी कायद्यामध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव असून प्रस्तावित विधेयकाची मुख्य वैशिष्ट्ये जाहीर करण्यात आली आहेत. गैर प्रकार करणाऱ्या व ज्यांच्याबद्दल तक्रारी आहेत अशा नोटरी वकिलांचे परवाने निलंबित करणे, अमर्याद कार्यकाळ कमी करून टप्प्याटप्प्याने 15 वर्षे करणे, आदी सुधारणा प्रस्तावित आहेत. त्यावर हितधारकांकडून सूचना जाणून घेण्यासाठी मसुदा नोटरी (सुधारणा) विधेयक जारी करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर हे आंदोलन करण्यात येत आहे.
संघटनेकडून कळविण्यात आलेे आहे की, नवीन नोटरी नेमताना 15 वर्ष पेक्षा जास्त नोटरी असलेल्यांना काढू नये, प्रत्येक नोटरी वकिलांना विधी व न्याय विभागाचे ओळखपत्र मिळावे, तसेच नोटरी वकिलांना पथकर टोल मध्ये माफी मिळावी, अशा मागण्या संदर्भात एक दिवस नोटरी कामकाज बंद ठेवण्यात आले आहे. सर्व नोटरीना आवाहन करण्यात येत आहे की कोणीही 14 डिसेंबरला नोटरी चे कामकाज करू नये. सर्वांनी एकजुटीने या बिलाचा विरोध करावा. बार कौन्सिल महाराष्ट्र आणि गोवा ही नोटरी वकिलांच्या सोबत आहे .सर्व स्थानिक बार असोसिएशन कडून बिला संदर्भात विरोधाचे पत्र विधी व न्याय विभागाला पाठवावे तसेच आपले बीला संदर्भात विरोध असल्याचा मेल tk.malik@nic.in या मेल वर दिनांक 15/12/21 पर्यंत पाठवावा असे आवाहन महाराष्ट्र आणि गोवा नोटरी असोसिएशन (पिंपरी चिंचवड,खेड ,मावळ तालुका) ॲड.अतिश लांडगे यांनी केले आहे.