न्यूमोनियामुळे होणारे बालमृत्यू रोखण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यात ‘सांस’ अभियान

 

नंदुरबार : न्यूमोनियामुळे होणारे बालमृत्यूचे प्रमाण रोखणे आणि बालकांमधील न्यूमोनियाचा प्रतिबंध आणि बचावासाठी नंदुरबार जिल्ह्यात 12 नोव्हेंबर 2021 ते 28 फेब्रुवारी 2022 या कालावधीत ‘सांस’ राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा कृती दलाच्या बैठकीत देण्यात आली.

या अभियांनाबाबत जिल्हा कृती दलाची बैठक आज झाली. यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी महेश पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र चव्हाण, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. संजू वळवी, बाह्य संपर्क अधिकारी (सामान्य रुग्णालय ) सुलोचना बागूल, जिल्हा कार्यक्रम अधिकारी रणजित कुऱ्हे, शिक्षणाधिकारी राहुल चौधरी आदी उपस्थित होते.

या बैठकीत सांस (न्यूमोनिया) अभियान जिल्हा, तालुका तसेच ग्रामस्तरावर राबविण्यात येणार असून या अभियानातंर्गत बालकांमधील न्यूमोनियाचा आजार ओळखणे, न्यूमोनिया आजारास गंभीरपणे घेत त्यावर वेळेत उपचार, न्यूमोनिया आजाराविषयी असलेले गैरसमज व चुकीच्या कल्पना दूर करुन पालकांनी काय काळजी घ्यावी याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.

एचबीएनसी व एचबीवायसी कार्यक्रमांतर्गत गृहभेटी दरम्यान आशा सेविकांमार्फत सुधारीत एमसीपी कार्डचा वापर करुन न्यूमोनियाविषयक संदेश माता व कुटूंबाला वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यात येईल. तसेच प्रत्येक आशा सेविका या अभियांनातर्गत न्यूमोनियाग्रस्त बालकांचा शोध घेवून त्याला नजीकच्या आरोग्य केंद्रात किंवा आरोग्य सेविकेकडे संदर्भित करतील. संदर्भित करण्यापूर्वी सिरप ॲमोक्सिसीलीन ची मात्रा देण्यात यावी, असेही बैठकीत सांगण्यात आले.

न्यूमोनियाग्रस्त बालकांना लसीकरण मोहिमेंतर्गत सहाव्या, चौदाव्या आठवड्यात व नवव्या महिन्यात (बूस्टर डोस ) या पध्दतीने पीसीव्ही लस देण्यात येईल. त्यामुळे न्यूमोनियाचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. या मोहिमेत जास्तीत जास्त नागरिकांनी सहभावी व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!