नंदुरबार (प्रतिनिधी)- भोणे फाट्याजवळील व जिल्हा रुग्णालय परिसरातील नगरपालिकेने निर्माण केलेल्या घरकुल वसाहतींमध्ये नगरपरिषदेच्या विद्युत विभागाकडून विद्युत रोहित्र बसविण्यात आले आहेत. दोन्ही ठिकाणी 200 केव्ही क्षमतेचे रोहित्र असून पथदिव्यांची सोय करण्यात आली. त्याचबरोबर नवापूर चौफुली ते जिल्हा रुग्णालयापर्यंत परिसरातील रस्त्यावर नवीन 25 विद्युत खांबांसह दिवे बसविण्यात आले. त्यामुळे त्या परिसरातील रस्त्यांवर झगमगाट दिसू लागला आहे.
याविषयी देण्यात आलेल्या माहिती म्हटले आहे की, नंदुरबार शहरातील नवापूर चौफुली ते जिल्हा रुग्णालय परिसरात विद्युत व्यवस्था नव्हती. जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल होणारे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना विद्युत व्यवस्था नसल्यामुळे मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याची बाब शिवसेनेचे नेते तथा माजी आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तात्काळ पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना सूचना केल्या. त्यानंतर विद्युत विभागाचा पथकाने काम हाती घेतले. नवापूर चौफुली ते जिल्हा रुग्णालयापर्यंत परिसरातील रस्त्यावर नवीन 25 विद्युत खांबसह दिवे बसविण्यात आले आहेत. त्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची सोय झाली.
नगरपरिषदेच्या विद्युत विभागाकडून पथदिव्यांची कामे हाती घेण्यात आली आहेत. शहरातील अनेक वसाहतींमध्ये नवीन पथदिवे बसवल्याने परिसर प्रकाशमान झाले आहेत.नवापूर चौफुली ते जिल्हा रुग्णालयापर्यंत पथदिवे बसविण्यात आले असून,दोन्ही घरकुलांमध्ये विद्युत रोहित्र बसविण्यात आल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे. शहरात 100 पेक्षा जास्त नवीन विद्युत खांबासह दिवे लावण्यात आले आहेत. त्यामुळे परिसरात दिव्यांच्या लखलखाटात दिसून येत आहे. नगरपालिकेकडून दिव्यांची सोय झाल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे; असेही माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीत म्हटले आहे.