नंदुरबार – माजी मंत्री पद्माकर वळवी आणि माजी नगराध्यक्ष भरत माळी यांच्यासह काँग्रेसचा एक मोठा गट भारतीय जनता पार्टीत प्रवेश करणार; या चर्चेने सध्या बराच धुरळा उडवला आहे. तथापि स्वतः पद्माकर वळवींसह भारतीय जनता पार्टीतील जबाबदार पदाधिकारी अशी कोणतीही शक्यता नसल्याचे सांगत आहेत. यामुळे पद्माकर वळवी यांच्या पक्षांतराची शक्यता, किती खरी, किती खोटी? याविषयी कार्यकर्ते संभ्रमात आहेत.
मुळात एडवोकेट पद्माकर वळवी हे चळवळीतून उभे राहिलेले धाडसी नेतृत्व असून कट्टर काँग्रेसी विचारांचे आहेत. त्यांना आरएसएसची विचारसरणी कधीही मान्य झाली नाही. परिणामी पद्माकर वळवी भाजपात प्रवेश करतील, यावर निरनिराळी मते मांडली जातात. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट शिवसेनेतून बाहेर पडून भाजपासोबत गेला तेव्हापासून आणि माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटाशी त्यांनी थेट स्पर्धा सुरू केल्यापासून महाराष्ट्रातील राजकारण पार ढवळून निघाले आहे. एकनाथ शिंदे यांच्या पाठोपाठ मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखील भाजपासोबत युती करणार; असे बोलले जात आहे. नेत्यांचे ‘इनकमिंग’ चालू ठेवण्यासाठी भाजपा काहीही तडजोड करू शकते, असा संदेश त्यामुळे सर्वत्र गेला आहे. असे असतानाच नंदुरबार जिल्ह्यातील काँग्रेसचे माजी मंत्री व माजी नगराध्यक्ष भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली आणि जिल्ह्याचे राजकारण पुन्हा नवे वळण घेणार, असे संकेत दिले जाऊ लागले. एका माहितीनुसार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दोंडाईचा दौऱ्या प्रसंगी झालेल्या एका संवादामुळे ही स्टोरी वाढत गेल्याचे समजते. अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघासाठी माजी मंत्री पद्माकर वळवी यांचा विचार भाजपाने करावा असा मुद्दा खाजगी चर्चेत एका नेत्याने त्या ठिकाणी उपस्थित केला होता, असेही समजते. पक्ष स्तरावर तेव्हापासून हालचाली सुरू आहेत का? अशी शंका आता उपस्थित केली जाते.
माजी मंत्री एडवोकेट पद्माकर वळवी यांच्याशी थेट संपर्क साधला असता त्यांनी या सर्व शक्यता फेटाळून लावल्या. “मी आजही काँग्रेस पक्षात आहे मला कोणतीही ऑफर आलेली नाही सध्या चालू असलेली चर्चा निव्वळ अफवा आहे”; असे स्पष्ट करून पद्माकर वळवी म्हणाले की, “मी माझ्या वाहनावरचे पंजा चिन्ह काढून टाकले ही देखील अफवा आहे कारण माझ्या वाहनांवर पूर्वीपासूनच पंजाचे चिन्ह लावलेले नव्हते. भाजपकडून ऑफर आली तर स्वीकारणार काय, यावर मी उत्तर देऊ शकत नाही कारण त्या सर्व जर-तर च्या गोष्टी आहेत” असेही पद्माकर वळवी म्हणाले.
ज्येष्ठ नेते डॉ. विजयकुमार गावीत यांचा नव्या मंत्रीमंडळात आदिवासी विकास मंत्री म्हणून समावेश झाल्यापासून जिल्हा भाजपातील उत्साह द्विगुणीत झाला आहे. नामदार डॉक्टर गावित यांना मंत्रिपद मिळाल्यामुळे नंदुरबार जिल्हा भारतीय जनता पार्टीची पुन्हा शक्ती वाढेल आणि जिल्ह्यात पक्ष पुन्हा वरचढ ठरणार; या कल्पनेने कार्यकर्ते भारावून गेले आहेत. अशातच आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री अॅड. पद्माकर वळवी, तळोद्याचे माजी नगराध्यक्ष भरत माळी यांच्याह, एक मोठा काँग्रेस गट भारतीय जनता पार्टीत प्रवेश करणार, अशी शक्यता वर्तवणाऱ्या चर्चेने सर्वांचे लक्ष वेधले आहे. नामदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसाच्या दिवशी माजी मंत्री पद्माकर वळवी, माजी नगराध्यक्ष भरत माळी व इतर अनेक पदाधिकारी एकत्रितपणे डॉक्टर गावित यांच्या बंगल्यावर जाऊन शुभेच्छा देण्याच्या निमित्ताने भेटले होते त्याचवेळी अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.
त्यांची कन्या सीमा वळवी ह्या सध्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा आहेत. त्यामुळे ते भाजपमध्ये आल्यास अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघासाठी भाजपकडून त्यांचा विचार होऊ शकतो आणि त्यासाठीच त्यांचे इनकमिंग केले जात असल्याचे काही जणांना वाटते. परंतु हा तर्क सुद्धा निराधार आहे. कारण एडवोकेट सीमा वळवी काँग्रेस मधून निवडून आले असल्याने एक तृतीयांश सदस्य घेऊन त्यांना पक्षांतर करावे लागेल आणि तेवढे सदस्य त्यांच्या हाताशी नाहीत; असे जाणकारांचे मत आहे. माजी नगराध्यक्ष भरत माळी हेदेखील अमरीश भाई पटेल यांच्या माध्यमातून भाजपच्या वाटेवर असल्याचे म्हटले जाते. येत्या काही महिन्यात तळोदा नगरपालिकेची निवडणूक होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर भरत माळी यांच्या पक्ष प्रवेशा संदर्भातील भूमिकेला महत्त्व राहणार आहे. सध्या चाललेल्या चर्चा प्रत्यक्षात खऱ्या उतरतात का यावर हे सर्व अवलंबून आहे.
दरम्यान भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष विजय भाऊ चौधरी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी “पक्ष स्तरावर अशा कोणत्याही पक्षप्रवेशाविषयी चर्चा घडलेली नाही तसेच माझ्यापर्यंत त्या संदर्भाने पक्षाकडून सूचना आलेल्या नाहीत, असे स्पष्ट केले. भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष तथा अक्कलकुवा येथील भाजपा चे प्रमुख नेते नागेश दादा पाडवी यांनी सांगितले की, “कोणाला पक्ष प्रवेश द्यायचा असेल तर वरिष्ठ स्तरावर एक कमिटी आहे जिल्हास्तरावर कमिटी आहे त्यांच्या माध्यमातूनच निर्णय होतात आणि माझ्या माहितीप्रमाणे आमच्या पक्षात अद्याप तरी दुसऱ्या पक्षातील नेत्यांना प्रवेश देणे विषयी चर्चा झालेली नाही परस्पर वरिष्ठांशी त्यांचे काही बोलणे झाले असल्यास ते त्यांनाच माहीत मला माहित नाही”