नंदुरबार – केळी आणि ऊस खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांप्रमाणेच पपई खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांनी सुद्धा मनमानी चालवली आहे. या मनमानीमुळे त्रासलेल्या शहादा व तळोदा तालुक्यातील शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने कृषीव्यापार क्षेत्रात निराळेच वादळ उठले आहे. पुढील वर्षात पपईचे पीक घ्यायचेच नाही; असा ऩिर्धार करणे गावागावात सुरु झाले आहे. पपई लागवड 100 टक्के बंद करायची, असे ठराव गावा गावातून केले जात आहेत.
नंदुरबार जिल्ह्यातील केळी, ऊस आणि पपई पिकवणाऱ्या शेतकऱ्यांकडील माल पड्या भावात घेण्याची भूमिका ठेवून दरवर्षी व्यापारी अडून बसतात आणि उघडपणे शेतकऱ्यांची पिळवणूक करत असतात, असे या शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. दरवर्षी उद्भवणारी ही समस्या सोडवली जात नसल्याने यंदा उग्र प्रतिक्रिया उमटलेली दिसते. प्रत्येक गावाला केळी, ऊस व पपई उत्पादक शेतकरी एकत्रित येऊन बैठका घेत आहेत. त्या बैठकांमधून ्यापार्यांच्या आडमुठेपणा वर संतप्त प्रतिक्रिया मांडल्या जात आहेत. लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यांच्या दरबारात वेळोवेळी या प्रकरणावर व्यथा मांडून झालेल्या असतानाही मार्ग काढण्यात आला नाही तसेच व्यापाऱ्यांना आवर घालण्यात आला नाही; याविषयी देखील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी दिसून आली. मागील दोन दिवसात मोड, सुलवाडे, ब्राह्मणपुरी, तरहाडी बुद्रुक या गावांमधे शेकडो शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन ठराव केले. पुढील वर्षी पपई लागवड शंभर टक्के बंद ठेवायची अशी भूमिका अन्य गावातील शेतकरी देखील घेऊ लागले आहेत.