वाचकांचं पत्र:
पराचा कावळा करणाऱ्यांना दंडीत करा !
प्रति,
संपादक महोदय,
मागील आठवड्यात भारतात कोळशाच्या कमतरतेमुळे वीजटंचाईचे संकट येणार असल्याचे वृत्त वाचण्यात आले. काही नेत्यांनी वीजटंचाईच्या चर्चा चालू केल्या. त्यामुळे ‘चीनची दुःस्थिती पाहून देशाच्या छुप्या शत्रूंनी आणि चीनच्या मित्रांनी हे संदेश मुद्दामहून पसरवले कि काय असेही वाटले ! सध्या देशात कोळशाचा पुरेसा साठा असल्याचे सांगून केंद्रीय ऊर्जामंत्री यांनी जनतेला आश्वस्त केले.
तसेच केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाकडून उपाययोजना म्हणून आठवड्यातून २ वेळा संपूर्ण देशातील उपलब्ध कोळशाच्या साठ्याचा आढावा घेतला जाणार आहे, नियमित देयके भरणार्या वीज आस्थापनांना कोळसा पुरवण्यात येणार आहे, अधिक कोळशाचे उत्पादन करण्याचे केंद्र सरकारने निश्चित केले आहे हे ऐकून भारतीयांना नक्कीच आनंद मिळाला. परंतू वीजटंचाईचे संकट ग्राह्य धरून नागरिकांनी आपत्कालीन उपाययोजना पण कराव्यात असे वाटते. जसे की सौर उर्जेवर चालणारी उपकरणे वापरणे, पाणीसाठा करून ठेवणे इत्यादी. तसेच वीजटंचाईच्या अफवा पसरवणार्यांवर सरकारने कठोर कारवाई करणे पण अपेक्षित आहे !