नंदुरबार – राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी गेल्या तीन महिन्यांपासून चालवलेला संप परीक्षा काळ आणि विद्यार्थ्यांच्या समस्या लक्षात घेऊन मिटवावा; अशी मागणी करीत महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघाच्या नंदुरबार तालुका शाखेतर्फे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ई-मेल निवेदनाद्वारे साकडे घालण्यात आले आहे.
महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघाचे नंदुरबार तालुका अध्यक्ष महादू हिरणवाळे, संघटक योगेश्वर जळगावकर, सदस्य डॉ. गणेश ढोले, ॲड. निलेश देसाई, नितीन पाटील, दर्शन ठक्कर, वैभव करवंदकर, रघुनाथ अहिरे, भरत माळी, अशोक यादबोले, संभाजी पाटील,बी.डी. गोसावी, अनिल बरे, शैलेश जाधव,प्रा. गीता जाधव, अबोली चंद्रात्रे, पूनम भावसार आदी सदस्यांच्या निवेदनावर स्वाक्षरी आहेत.
या निवेदनात म्हटले आहे की, राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावी आणि बारावीची लेखी परीक्षा दिनांक 4 आणि 15 मार्च पासून सुरु होत आहेत. यामुळे विद्यार्थी वर्गाला परीक्षा केंद्रापर्यंत नियोजित वेळेत पोहोचण्याची गरज राहणार आणि त्यासाठीच सर्वांचे एसटीच्या संपाकडे आणि राज्य शासनाकडे लक्ष लागले आहे. हा मार्ग सुकर व्हावा अशीच ग्रामीण भागातील लक्षावधी विद्यार्थ्यांसह पालकांची अपेक्षा आहे. शिवाय ऐन लग्नसराईच्या हंगामात एसटी महामंडळाच्या संपाचा फायदा घेत अनेक खाजगी वाहन चालक अव्वाच्या सव्वा भाडे आकारून प्रवाशांची पिळवणूक करीत आहेत. तरी एसटीअभावी जनतेच्या होत असलेल्या हाल-अपेष्टांची दखल घ्यावी आणि राज्याचे कुटुंबप्रमुख म्हणून त्या थांबवाव्यात, असे निवेदनात म्हटले आहे. दरम्यान, एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण करावे या मागणीसाठी सुरु असलेल्या संपाची शुक्रवारी सुनावणी होणार आहे. उच्च न्यायालयाच्या या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.