नंदुरबार – रस्ताच नाही म्हटल्यावर दुर्गम भागातील लोक दैनंदिन गरजांसाठी किती जीव धोक्यात घालून जा-ये करतात याचे थरारक दृश्य तळोदा तालुक्यातील अलवान गावानजीक पाहायला मिळाले. प्रत्यक्षदर्शींनी पाठविलेले त्याविषयीचे चित्रीकरण अंगावर काटा आणणारे आहे. (चित्रीकरण खाली जोडले आहे) प्रशासकीय यंत्रणा दुर्गम लोकांच्या समस्येला गंभीर मानून कधी उपाय करणार ? हा संतप्त प्रश्न त्या भागातील युवक करू लागले आहेत.
डोंगराळ भागात पक्या रस्त्यांचा अभाव असतोच. परंतु ज्या कच्चा रस्त्यांवरून तेथील रहिवासी जा-ये करतात ते रस्ते नाल्यांना आलेल्या पुरामुळे उध्वस्त होऊन एकाच वेळी अनेक गावांचा संपर्क खंडित होण्याचा प्रसंगही नित्याचा बनला आहे.
(चलचित्र साभार)
दिनांक 22 सप्टेंबर 2021 रोजी दुपारी 3 ते 4 वाजे दरम्यान सातपुडा पर्वत रांगेत मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे अनेक कच्चे रस्ते खचून गेले तर नाल्यांना आलेल्या पुरामुळे काही गावांचा संपर्क खंडित झाला. सातपुडाच्या पायथ्यालगत असलेल्या तळोदा तालुक्यातील अलवान ग्रामपंचायती अंतर्गत येत असलेल्या अक्रानी, केलीपानी, बेडवाई(विहिरीमाळ) या गावांना नेणारा प्रमुख मार्ग देखील नाल्याच्या पुरामुळे अडविला गेला. परंतु अन्य मार्ग नसल्यामुळे तेथील लोकांना थेट पूरातूनच ये-जा करावी लागली. डोंगराळ भागातील लोकांना कधी पर्यंत जीव धोक्यात टाकून असा प्रवास करावा लागेल? असा संतप्त प्रश्न तेथील युवकांनी केला आहे. त्यांचे म्हणणे आहे की, अनेक वेळेस रस्ते मंजुरी साठी प्रस्ताव अर्ज देऊन सुद्धा शासन व प्रशासन येथील ग्रामस्थांकडे दुर्लक्ष करत आहे. बोरवान, टाकळी दरम्यान नदीला पूर आल्यामुळे येथील पाड्यातील लोकांना नदीतून जीव धोक्यात टाकून प्रवास करावा लागत आहे, अशी माहिती देखील त्यांनी दिली.
खराब रस्त्यांमुळे तसेच सदोष घाट रस्त्यांमुळे दुर्गम भागात अपघात होऊन एकाच वेळी 8 – 9 प्रवासी मरण पावल्याची घटना अलीकडे घडल्या आहेत. असे असतानाही जीव धोक्यात घालून प्रवाशांसह थेट पुराच्या पाण्यातून गाड्या धावतात. याला अपूर्ण व खराब रस्ते काम जबाबदार असल्याचे मत ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.