पाऊण शतकाचा कार्येतिहास लाभलेले शिक्षक स्व. डी. एन. पाटील सर !

पाऊण शतकाचा कार्येतिहास लाभलेले
शिक्षक स्व. डी. एन. पाटील सर !
नंदुरबार येथील लोकमान्य टिळक विद्यालयाचे निवृत्त शिक्षक तसेच मानाच्या तात्या गणपतीचे प्रमुख संस्थापक डी. एन. पाटील यांचे वयाच्या ९३ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या जीवनातील सामाजिक, शैक्षणिक कार्याचा हा थोडक्यात परिचय येथे देत आहोत..
डी एन पाटील उपाख्य धरमदास नारायण पाटील यांचा ८ एप्रिल १९२९ रोजी जन्म झाला. त्यांचे शिक्षण नंदुरबार ,धुळे ,पुणे या ठिकाणी झाले. आईवडिलांकडून मिळालेल्या संस्कारामुळे त्यांनी शिक्षकी पेशा स्विकारून ज्ञानदानाचे कार्य करण्याचे ठरविले. १९५६ ला नंदुरबार येथील लोकमान्य टिळक विद्यालयात शिक्षक म्हणून रुजू होऊन ज्ञानदानाचे कार्य सुरू केले. त्यांच्या सुमारे ३५ वर्षाच्या या सेवेत अनेक विद्यार्थी त्यांनी घडविले. कुंभाराने मातीच्या गोळ्याला आकार देत घडवावे, तसे त्यांनी संस्कारक्षम विद्यार्थी घडविले.
साधी राहणी व उच्च विचार हे तर  डी.एन. पाटील यांच्या राहणीमानाचेच नव्हे तर विचारसरणीचे वैशिष्ट्य म्हणता येईल. त्यांची प्रेमळ आश्वस्थ करणारी संंवाद शैली सर्वांनाच भावायची.
सामाजिक, शैक्षणिक कार्यासोबतच त्यांचा अध्यात्मिक कार्यातही सहभाग असायचा. तथापि त्यांच्या जीवनकार्यातील सर्वात उल्लेखनीय भाग म्हणजे तात्या गणपतीच्या माध्यमातून केलेले कार्य होय. लोकमान्य टिळकांना अभिप्रेत असलेला असा सामाजिक गणेशोत्सव त्यांनी अविरत  सुरू ठेवला. यासाठी त्यांना वडील बंधू (कै.) चिंधु नारायण पाटील (कै.)मोतीराम नारायण पाटील यांची प्रेरणा मिळाली. नंदुरबार शहरातील मानाच्या तात्या गणपतीची स्थापना त्यांनी केल्याची आठवण अजूनही आवर्जून सांगितले जाते. लोकमान्य टिळक यांच्या सर्वाजनिक गणेश उत्सवातून प्रेरणा घेऊन त्यांनी त्याकाळी विशेष सहभाग घेतला होता. नंदुरबार मधील मानाच्या गणपती मंडळात तात्या गणपती देखील गणला जातो. या मंडळाच्या माध्यमातून त्यांनी सुमारे ८३ वर्ष अविरत सेवा केली.  मानाच्या तात्या गणपतीची मूर्ती काळ्या मातीपासून बनवून पर्यावरणाचा समतोल राखण्याची  परंपरा आजतागायत टिकवून ठेवली.
    त्यांनी विद्यानगर हाउसिंग सोसायटीचे चेअरमन पद भूषविले होते, १९९८ मध्ये त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत शासनातर्फे विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली होती. अशा विविध पदांवर राहून सामाजिक कार्य केले. वाचनाची, लेखनाची त्यांना विशेष गोडी होती. त्यांनी विविध ठिकाणी लेख लिहून सामाजिक प्रबोधन केले. शिवाय त्यांनी काव्य लेखनाचा देखील छंद जोपासला होता. त्यांनी लोकमान्य टिळक, महाराणा प्रताप, शहीद शिरीष कुमार मेहता, यासह हुंडाबळी व सामाजिक विषयांवर कविता केल्या. त्यांनी लिहिलेले लेख व कविता अनेक लोकप्रिय वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध देखील झाले. गणेशोत्सवाच्या माध्यमातून त्यांनी विविधांगी समाज प्रबोधन केले.
 जूनी भोई गल्ली परिसरात गणेशोत्सवा दरम्यान दहा दिवस पाटील सरांकडे पर्वणीच असायची.  आता त्यांचे चिरंजीव प्रदीप पाटील व प्रवीण पाटील यांनी भक्तीचा तो जागर पुढे अविरत सुरू ठेवला आहे. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून सरांचे नातवंडे निखिल प्रदीप पाटील, अक्षय प्रवीण पाटील हे कार्य पुढे अविरतपणे तेवत ठेवतील असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
अखेर सुरू झालेला प्रवास कुठेतरी थांबतो हा निसर्ग नियमच आहे. त्यानुसार वयाच्या ९३ व्या वर्षी डी. एन. पाटील सरांनी दि.२८ जानेवारी २०२२ या दिवशी जगाचा निरोप घेतला व नंदुरबार येथील अहिरराव परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला.
त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो ही प्रभू चरणी प्रार्थना !
– नितीन राजपूत, नंदुरबार.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!