नंदुरबार : नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयात भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या ७६ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित सोहळ्यात नंदुरबार जिल्ह्याचे शिल्पकार महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते शानदारपणे ध्वजारोहण पार पडले.
केंद्र पुरस्कृत पशुस्वास्थ व रोग नियंत्रण कार्यक्रमाच्या फिरत्या पशु पथकांच्या वाहनांचे लोकार्पण यावेळी पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते, मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, खासदार डॉ. हिना गावीत, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास नाईक, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, जिल्हाधिकारी मनिषा खत्री, जिल्हा पोलीस अधिक्षक पी.आर. पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम.सावन कुमार, अपर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, उपजिल्हाधिकारी गोविंद दाणेज, गणेश मिसाळ, कल्पना निळ-ठुबे, उपविभागीय अधिकारी मंदार पत्की, जिल्हा शल्य चिकित्सक चारुदत्त शिंदे व विविध यंत्रणांचे प्रमुख-कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते.
यांचा झाला सन्मान…
▶️ महात्मा ज्योतिराव फुले/ प्रधान मंत्री जन आरोग्य योजनेत उल्लेखनीय कार्याबद्दल प्रशस्तीपत्र : सामान्य रूग्णालय, नंदुरबार आणि मेडिकेयर सर्जिकल आणि डेन्टल हॉस्पिटल, नंदुरबार
▶️ 45वर्षापासून रखडलेल्यी देहली मध्यम प्रकल्पाची काम समन्वयाने पूर्ण केल्या बद्दल प्रशस्तीपत्र तुषार प्रभाकर चिनावलकर कार्यकारी अभियंता, नंदुरबार मध्यम प्रकल्प विभागीय पथक नंदुरबार
स्वातंत्र्याचा ७६ वा वर्धापन दिन निमित्ताने माननीय पंतप्रधान यांच्या व्हिजन 2047 चा संदेश प्रत्येक गावात प्रदर्शित केला जाणार आहे. ‘वसुधा वंदन’ सारख्या उपक्रमातून 75 देशी वृक्षांची लागवड केली जाणार असून 30 ऑगस्ट रोजी त्याचा समारोप होणार आहे, अशी माहिती याप्रसंगी नामदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी दिली.
पालकमंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित प्रमुख भाषणात म्हणाले, आपल्या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी नुकतीच ‘मेरी माटी, मेरा देश’ मोहिमेची घोषणा केली. ही मोहीम जिल्ह्यात 9 ऑगस्ट रोजी नियोजित कार्यक्रमांसह सुरू झाली आहे. देशासाठीं बलिदान दिलेल्या शूरवीरांच्या स्मृतिप्रीत्यर्थ जिल्ह्यातील 639 ग्रामपंचायतींमध्ये शिलाफलक उभारले जात आहेत. गेल्या वर्षी आयोजित करण्यात आलेल्या ‘हर घर तिरंगा’ या अभियानाला जिल्ह्यात मोठा प्रतिसाद लाभला होता. या वर्षीही ही मोहिम आपण हाती घेतली आहे, मला खात्री आहे संपूर्ण जिल्हा यात अभूतपूर्व उत्साहाने आपला सहभाग नोंदवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ते म्हणाले, माती आणि माणसांशी मनापासून नाती जोडण्याचं काम ग्रामविकास विभाग व जिल्हा परिषदेच्या माध्यमातून होत असते. नंदुरबार जिल्हा परिषदेच्या ग्रामस्वराज्य अभियानातून 97 ग्रामपंचायतींना कार्यालयांची बांधकामे मंजुर करण्यात आली आहेत. जनसुविधांमधून 87 ग्रामपंचायतींना येणाऱ्या वर्षात ग्रामपंचायत कार्यालयांच्या बांधकामांना मंजुरी देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना जनसुविधांमधुन स्मशानभुमीचे बांधकाम व त्यासाठी जोड रस्ते मंजुर करून पूर्ण करण्यात येणार आहेत. पिण्याच्या शुद्ध पाण्यापासून कुठलेही गाव, घर आणि व्यक्ती येणाऱ्या वर्षात वंचित राहणार नाही, तसेच येणाऱ्या 30 वर्षांसाठी पुरेल एवढ्या पेयजलाचे सुक्ष्म नियोजन जलजीवन मिशनच्या माध्यमातून करण्यात आले आहे.