नंदुरबार – नेत्रंग-शेवाळी राष्ट्रीय महामार्गाचा भाग असलेल्या वाका-निझर चौफुली ते तळोदा प्रमाणेच नंदुरबार शहरातून जाणार्या रस्त्यांवरीलही खड्डे कमालीचे जीवघेणे झालेले असतांना राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी निद्रिस्त आहेत तर सार्वजनिक बांधकाम विभागाने देखील धुळे रस्त्याला अगदी वाहतुकीच्या ठिकाणी पडलेला खड्डा दुर्लक्षीत करणे चालवलेले आहे. भली मोठी दुर्घटना घडण्याची प्रतिक्षा हे अधिकारी करीत आहेत का? असा प्रश्न केला जात आहे. दरम्यान, धुळे चौफुलीवर नंदुरबार नगरपालिकेने सुरु केलेल्या डागडूजीमुळे अचानक काही खड्ड्यांचे भाग्य उजळल्याचे पहायला मिळाले.

नंदुरबार शहरात प्रवेश घेण्यासाठी आणि बाहेर पडण्यासाठी धुळे रस्ता हा एकमेव मार्ग आहे. यामुळे दोंडाईचा, शिरपूर, सोनगीर, धुळे, जळगाव, नाशिक या दिशेने जाणारी अथवा तिकडून नंदुरबारला येणारी सर्व तर्हेची जडवाहतूक ही धुळे रस्त्यावरुन होत असते. नवापूर बायपास आणि शहादा बायपास याच धुळे रस्त्यावरील चौफुलीला जोडला जातो. त्यामुळे नवापूर अथवा शहादा-तळोदाकडून ये-जा करणारी सर्व जडवाहतूक नंदुरबार शहराच्या एवढ्या एकमेव भागात एकवटून धावत असते. परिणामी धुळे चौफुली ते शहादा मार्गावरील करणचौफुलीपर्यंत तसेच धुळे चौफुली ते साक्री मार्गावरील नवापूर चौफुलीपर्यंत आणि धुळे चौफुली ते हिरा एक्झीकेटीवपर्यंतचा रस्ता अत्यंत वेगवान धावणारे जड डंपर्स व तुडूंब माल भरलेल्या ट्रकांनी व्यापलेला असतो. असे असतांना या रस्त्यांची निगा राखण्याचे काम मात्र संबंधीत विभागाने जणू सोडून दिलेले आहे. अवघे अडीच तीन वर्षांपूर्वी नव्याने डांबरीकरण करण्यात आलेल्या धुळे रस्त्याची पार दुर्दशा झालेली आहे. दुतर्फा असूनही एकेरी मार्ग वाटावा असे त्याचे स्वरुप बनले आहे. हॉटेल गौरवनजीकच्या भागात अडीच फुटाचा पडलेला खोल खड्डा अपघाताला निमंत्रण देणारा आहे.

दुचाकीवाहन त्यात अर्धे फसून जाईल इतका खोल असलेला हा खड्डा रात्री अंधारात धावणार्या वाहनधारकाला दिसला नाही तर काहीही मोठी दुर्घटना उदभवू शकते. असे असतांना संबंधीत अधिकारी आणि लोकप्रतिनिधी मात्र गप्प आणि निष्क्रिय आहेत. कोणाचा जीव जाईल, याच्याशी या मंडळींना काही देणे-घेणे जणू उरलेले नाही; अशी भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
त्या ठिकाणाहून चौफुलीच्या दिशेने येतांना सिमेंट कॉंक्रिटचा रस्ता लागतो. कोटी रुपये खर्चून दोन वर्षापूर्वी बनवलेल्या या रस्त्याला आताच फुटा-फुटाचे खड्डे पडून चाळण बनायला सुरुवात झाली आहे. या रस्त्याचा अर्धाभाग कायम नादुरुस्त वाहनांनी अडवलेला असतो. जणू सर्व गॅरेजवाल्यांना हा रस्ता आंदण दिला आहे. अनेक प्रकारची जड वाहतूक झेलणार्या धुळे चौफुलीवर अनेक महिन्यांपासून मोठ मोठे खड्डे पडलेले आहेत. शहरवासीयांना जड वाहनांमधून जीवघेणी कसरत करीत धुळ झेलत तिथून निघावे लागते. संबंधीत विभागाने कधीच हे लक्षात घेतले नाही. तथापि चौफुलीवर भेळविक्रीच्या गाड्या उभ्या राहतात त्या ठिकाणचे खड्डे बुजवायला आज नगरपालिकेने सुरुवात केली. नगरपालिका हद्दीत तेवढेच येतात म्हणून तेवढेच दुरुस्त होणार आहेत. पण तिथून शंभर फुटांवर अंबिका कॉलनी लगत पडलेले खोल खड्ड्यांचे काय? हा प्रश्न तसाच आहे. कारण राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी त्याची दखल घ्यायलाच तयार नाहित. या खड्ड्यांनी रस्त्याची लेवल इतकी बिघडवली आहे की, माल भरलेला ट्रक उलटण्याची घटना या ठिकाणी कधीही घडू शकते. याची किंमत स्थानिक कॉलन्यांमधील नागरिकांना अधिक मोजावी लागत आहे व जीव टांगणीला ठेऊन ये-जा करणे भाग पडत आहे. तांत्रिक कारणं काहीही असोत लोकांना सुविधा द्यायला हवी, असे असतांना आमदार, खासदार आणि नगरसेवक अशा बाबतीत आपली धमक का दाखवत नाहित? हा प्रश्न त्या भागातील संतप्त लोकांनी उपस्थित केला आहे.