नंदुरबार – दारू पिऊन दुचाकी आणि चार चाकी वाहन चालवणाऱ्यांवर कारवाई करण्याची जोरदार मोहीम अचानक पणे जिल्हा पोलिस दलाने सुरू केली असून काल दिनांक 24 ऑक्टोबर रोजी एकाच दिवसात जिल्हाभरात वेगवेगळ्या ठिकाणी 24 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
दारू पिणाऱ्या तळीरामांची तऱ्हा न्यारीच असते. पिल्याशिवाय त्यांच्या कामाला सुरुवात होत नाही. लहर आली तेव्हा पेग मारायचा आणि धावायचे, हे ठरलेले असते. काही शारीरिक श्रम करणाऱ्यांची ती शारीरिक गरज बनलेली असते आणि त्यामुळे संध्याकाळी हमखास ते अमलाखाली असतात. तर तिसरा प्रकार मौज मस्ती करणाऱ्यांचा आहे. मौज म्हणून दारू पिऊन गाडी उडवत धावणे त्यांना औरच वाटते. धुंदीत गाड्या पळवणाऱ्या अशांची मात्र आता खैर नाही; हा इशारा देत नंदुरबार जिल्हा पोलिस दलाने कारवाई सुरू केली आहे. प्रमुख रस्त्यांवर अचानक तपासणी होऊ लागली आहे.
काल दिनांक 24 ऑक्टोबर 2021 रोजी दुपारी तीन पासून रात्री नऊ वाजेच्या दरम्यान चौपाळे रस्ता, समशेरपुर रस्ता, तळोदा शहरातील दत्त मंदिर, अक्कल्कुवा बस स्थानक, खांडबारातील बाजार पेठ, धडगाव रेस्ट हाऊस, धडगाव तहसील परिसर, शहादा-धडगाव रस्ता, नवापूरातील रंगावली नदीचा काठ, नया होंडा पूल, नवापूर शहरातील गांधी चौक, लाईट बाजार, सारंखेडा, मोलगी, विसरवाडी अशा विविध ठिकाणी वाहनधारकांना अडवून तपासणी करण्यात आली. यात 24 जण दारू पिऊन वाहन चालवताना आढळले म्हणून संबंधित पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला.