धुळे-नंदुरबार जिल्ह्याच्या राजकीय इतिहासातील एक बहूअंगी कणखर नेता म्हणून ज्यांची कारकीर्द सदैव स्मरणात राहिल असे, स्वर्गीय अण्णासाहेब पी.के. पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे आज शनिवार दि. 18 सप्टेंबर 2021 रोजी अनावरण होत आहे. पुण्यतिथीचे औचित्य साधून श्री अण्णासाहेब पी.के. पाटील फाउंडेशनने आयोजित केलेल्या या सोहळ्यामुळे अण्णासाहेब पी.के. पाटील यांच्या कार्याची उजळणी त्यांच्या प्रत्येक चाहत्याच्या मनातून निश्चितच सुरू झाली असेल. शेतकरी, कष्टकरी, आदिवासी आणि हरिजन अशा दुर्लक्षित घटकांसाठी आपले राजकीय कौशल्य पणाला लावणारा आणि कोणा एका गटाचे नव्हे तर समूहाचे उत्थान घडवणारा नेता म्हणून त्यांनी केलेली कामे अनेक आहेत. परंतु त्यातल्या त्यात जवळपास 5000 आदिवासी हरिजन आणि अन्य गरीब शेतकऱ्यांना सावकारी पाशात अडकलेली त्यांची जमीन मिळवून देण्याचे केलेले कार्य विशेष सांगण्यासारखे आहे. आदिवासी समूहासाठी त्यांनी केलेले हे सर्वात मोठे कार्य सांगितले जाते.
धुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणून ते 3 वेळा निवडून आले. बँकेचे अध्यक्ष म्हणून पहिली तीन वर्ष, दुसऱ्यांदा चार वर्ष आणि तिसऱ्यांदा पुन्हा चार वर्ष असे ११ वर्ष ते अध्यक्ष होते.११ वर्षाची ही कारकीर्द अण्णांच्या सेवा अधिष्ठित राजकारणाची आणि बहुअंगी नेतृत्वाची पायाभरणी करणारी ठरली. या ११ वर्षांच्या काळात गोरगरीब, हरिजन, आदिवासी, शेतमजूर अशा शेकडो, हजारो अडाणी स्त्री-पुरुषांना समोर ठेवून त्यांनी कारभार केला. त्या कालावधीत उल्लेखनीय कार्य केल्याची आठवण जुने जाणकार सांगतात.
ती आठवण अशी की, तत्कालीन अखंड धुळे जिल्ह्यातले गाव अन गाव अभ्यासदौरे करून पिंजून काढला होता (नंदुरबार तेव्हा स्वतंत्र जिल्हा नव्हता). अध्यक्षीय कारकीर्दीच्या पहिल्या तीन वर्षांच्या काळात धुळे जिल्ह्यात असा एक गाव राहिला नाही जिथे अण्णा गेले नाहीत. या डोळस भटकंतीमुळं त्यांना जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर, आदिवासी व हरिजन यांच्या स्थितीचं स्पष्ट दर्शन झालं. आदिवासींचं अत्यंत पद्धतशीरपणे प्रचंड शोषण वर्षानुवर्षं चाललेलं त्यांच्या निदर्शनास आले. बँकेच्या अभ्यासदौऱ्यात त्यांना असंही पाहायला मिळाले की, नवापूर, अक्कलकुवा, तळोदा, शहादा या भागांत जमिन कसणाऱ्या कुळांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन सावकार शोषण करीत तसा प्रकार सुरु होता. हिशेबात अडाणी शेतकऱ्याला, आदिवासीला सावकार नाडत होते. शिवाय दुसरा प्रकार असाही होता की, ज्याच्या नावावर जमीन आहे तो मालक कुठंच हजर नसायचा. पण पिकासाठीचं बँकेचं कर्ज त्याच्या नावावरच उचललं जायचं. सर्व व्यवहार त्यांच्या नावावर पद्धतशीर सुरू असायचे. आदिवासी, हरिजन आणि छोट्या भूमिपुत्रांच्या जमिनी चक्क मोठी श्रीमंत माणसं आपल्या नावावर कसून घेत होते. त्या जमिनींचे नामधारी मालक मात्र दारिद्र्यात पिचत पडलेले असायचे. जमीन कुणाकडून तरी तुटपुंज्या रोजंदारीवर कसून घेतली जाते. मात्र उत्पन्न एक तिसराच श्रीमंत खात असतो. हा प्रकार डोंगराळ आदिवासी भागात सर्रास चालू होता.