नंदुरबार – तक्रारदार श्री. रऊफ रशिद खाटीक, राहणार प्रकाशा ता. शहादा जि. नंदुरबार यांच्या मालकीचा टाटा सिग्मा कंपनीचे या रंगाचे केविन व त्यावर निळया रंगाची बॉडी असलेला (एम.एच. 39.ए.डी. 2227 क्रमांक) 57 लाख रुपये किंमतीचा 16 चाकी हायवा (टिपर) मागील महिन्यात दिनांक 2 सप्टेंबर 2022 रोजी पहाटे 03.10 वा. सारंगखेडा गावातील श्रीकृष्ण पेट्रोलपंपवरुन कोणीतरी चोरुन नेला. म्हणून त्यांनी सारंगखेडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली व अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा हा अत्यंत गंभीर असल्यामुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी सदर गुन्ह्याचा तपास तातडीने करण्याबाबत आदेशीत केले.
पोलीस निरीक्षक श्री रविंद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली तपास पथके तयार करून तात्काळ गुजरात, मध्य प्रदेश, तेलंगाणा, कर्नाटक, राजस्थान इत्यादी राज्यात रवाना केले. सदर हायवामध्ये टाटा कंपनीचे व किसन कंपनीचे असे दोन जी पी एस सिस्टीम लावण्यात आलेले असतांना सुद्धा अज्ञात आरोपीतांनी सदर 16 चाकी हायवा चोरी केल्याने
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकापुढे त्यांचा शोध घेणे हे एक मोठे आव्हान होते,
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मालकाकडून गाडीमध्ये असलेल्या जी पी एस बाबत माहिती घेतली असता दि.02 सप्टेंबर 2022 रोजी ती सारंगखेडा शहादा- निझर या मार्गे गुजरात राज्यातील सुरत येथे गेल्याचे निदर्शनास आले. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस जीपीएसचा माग काढत सुरत शहर गाठले. जी. पी. एस. सिस्टीमचा माग काढल्यावर सदरचे जी. पी. एस. हे एका आयशर वाहनाच्या केबीनवर आढळून आले. अज्ञात चोरट्यांनी जी. पी. एस. हे शहादा सारंगखेडा या रस्त्यावरून जाणाऱ्या आयशर वाहनावर टाकून तपास पथकाची दिशाभूल केली होती. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या तपास पथकाने सारंगखेडा येथून शहादा, शिरपुर धुळे या मार्गाच्या सर्व ठिकाणांचे उपलब्ध असलेले सर्व सीसीटीव्ही फुटेज प्राप्त केले. त्या आधारे सदर वाहन कन्नड- औरंगाबादच्या दिशेने व तिथून नाशिकच्या दिशेने गेल्याची माहिती मिळविली. तपास पथकाने नाशिक शहरातील गॅरेज, चोरीचे वाहन घेणारे सराईत गुन्हेगार जुने वाहनाचे स्पेअरपार्ट विकत घेणारे विक्री करणारे तसेच वाहनाचे इंजिन नंबर, चेसिस नंबर यात बदल करणारे यांच्याबाबत माहिती खंगाळले. तेव्हा तपास पथकाला गुप्त बातमी कळाली की, नाशिक शहरातील राहणारा गुरुमुख सिंग उर्फ बिल्ला हा नाशिक शहरातील चारचाकी वाहने चोरणारा कुख्यात गुन्हेगार असून तो आज पावेतो पोलीसांच्या हाती लागलेला नाही. संशयीत गुरुमुख सिंग उर्फ बिल्ला पाचा कोणताही फोटो, मोबाईल क्रमांक वा त्याचे वर्णन नसल्याने त्याचा शोध कसा घ्यावा हे मोठे आव्हान पोलीस पथकासमोर होते. अखेर पोलीस पथकास पाहिजे असलेली माहिती प्राप्त झाली. गुरुमुख सिंग बर्फ बिल्ला हा मूळ पंजाबी असलेला इसम डोक्यावरील तसेच या मिशीचे केस काढून वेषांतर करून त्याचे पंजाब येथील साथीदारांसह नाशिक शहरातील आडगाव परिसरात चोरी गेलेल्या वाहनाच्या येणार असल्याची गुप्त बातमी मिळाली. तपास पथकाने आडगाव परिसरात शोधाशोध सुरु केल्यावर नाशिक-धुळे महामार्गावर डी-मार्ट समोर एक 16 चाकी हायवा (टिपर) उभा असलेला तपास पथकास दिसला. तपास पथकाने चोरी केलेले वाहन तेच आहे याची खात्री करून वाहनात बसलेला इसम यास ताब्यात घेवून विचारपूस केली वाहनातील संशयीत इसमास ताब्यात घेत असतांना चोरी गेलेल्या वाहनाजवळून एक इंडिका वाहन वेगाने निघून गेली. वाहनातील संशयीत इसमास नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव मनजित सिंग कशमिर सिंग वय-35 रा. वॉटर सप्लाय गल्ली. लोकल बस स्थानक जवळ, अमृतसर, जिंदलया गुरु, पंजाब राज्य ह.मु. संत जनार्धन अपार्टमेंट, आडगाव नाका, नाशिक असे सांगितले, तर पोलीस पथक आल्याचे पाहून इंडिका वाहनातून गुरुमुख सिंग अमर सिंग संधु उर्फ (बिल्ला) हरिसिंग राजपूत व बलजित सिंग (पूर्ण नाव माहिती नाही हे पळून गेल्याचे सांगितले
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कायदेशीर प्रक्रीया करुन गुन्हयातील चोरी गेलेला 57 लाख रुपये किंमतीचा हा (टिपर) जमा केला असून गुन्ह्यातील फरार आरोपी गुरमुख सिंग अमर सिंग संधु उर्फ बिल्ला व त्याचा साथीदार बलजितसिंग यांना देखील लवकर अटक केली जाईल असे नंदुरबार जिल्ह्याचे मा पोलीस अधीक्षक श्री पी आर पाटील यांनी सांगितले.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, सहा. पोलीस निरीक्षक श्री. संदीप पाटील, पोलीस नाईक पुरुषोत्तम सोनार, मोहन ढमढेरे, विकास कापूरे, पोलीस अमलदार किरण मोरे, यशोदिप ओगले यांच्या पथकाने केली.