पोलिस भरती परीक्षा: अधिक्षकांकडून परीक्षा केंद्राची पाहणी

नंदुरबार – नंदुरबार जिल्हा पोलीस दलामार्फत घेण्यात येणाऱ्या पोलिस भरती लेखी परीक्षा- 2019 उद्या रविवार दिनांक 14 नोव्हेंबर रोजी नंदुरबार येथे घेण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी पोलिस पथकासोबत शहरातील पोलीस भरती लेखी परीक्षा केंद्रांची पाहणी केली.

शुक्रवारी सायंकाळी शहरातील एकलव्य विद्यालय इमारतीच्या परीक्षा केंद्राची पाहणी पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी केली व  आवश्यक त्या सूचना दिल्या. परीक्षा केंद्र पाहणी प्रसंगी अप्पर पोलीस अधीक्षक विजय पवार, शहर पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्र भावसार तसेच एकलव्य विद्यालयाचे उपशिक्षक संतोष पाटील,टिका पाडवी उपस्थित होते. नंदुरबार शहरात पोलीस भरती लेखी परीक्षेसाठी एकूण 11 केंद्राची निवड करण्यात आली आहे .यात कमला नेहरू कन्या विद्यालय, यशवंत विद्यालय, श्रॉफ हायस्कूल, डी. आर. हायस्कूल, डॉ. काणे गर्ल्स हायस्कूल, एस. ए. मिशन हायस्कूल, जी. टी. पाटील महाविद्यालय ,अँग्लो उर्दू हायस्कूल,पी.के. पाटील माध्यमिक विद्यालय, एकलव्य विद्यालय, पोद्दार इंटरनॅशनल स्कूल या प्रमाणे 11 केंद्रांवर परीक्षा घेण्यात येणार आहे. सदर परीक्षा केंद्राच्या 200 मीटर परिसरात 14 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 वाजेपासून ते दुपारी तीन वाजेपर्यंत प्रवेशाला बंदी राहील. सदरचे आदेश परीक्षार्थी, नियुक्त कर्मचारी, अधिकारी, पोलीस, होमगार्ड, यांच्यासाठी लागू होणार नाही. तसेच परीक्षा केंद्रा जवळच्या 200 मीटर परिसरातील सर्व सार्वजनिक टेलिफोन, एसटीडी, आयएसडी केंद्र, झेरॉक्स दुकाने, कॉम्प्युटर दुकाने व ध्वनीक्षेपक परीक्षेच्या कालावधीत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. परीक्षा केंद्राच्या ठिकाणी गैरप्रकार होऊ नये आणि त्या ठिकाणी शांतता व सुव्यवस्थेस बाधा निर्माण होऊ नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हादंडाधिकारी मनिषा खत्री यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 ,(2 )नुसार परीक्षा केंद्राच्या 200 मीटर परिसरात प्रवेश बंदीचे आदेश पारित केले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!