प्रकाशा गावांत डेंग्यूसह मलेरियाचे थैमान ?

नंदुरबार – गेल्या काही दिवसात प्रकाशा गावातील वेगवेगळ्या भागांत डेंग्यूसदृश आजाराने म्हणजे थंडी, ताप, अंगदुखीने हैराण झालेल्या रुग्णाची संख्या वाढली आहे तर काही जणांना मलेरिया झाल्याचे निष्पन्न झाले असून बहुतांश रुग्ण खाजगी रुग्णालयातून उपचार घेत आहेत. शासकीय यंत्रणेने मात्र हे गांभीर्याने घेतलेले नाही. शासकीय अधिकारी मोठ्या साथीच्या संकटात रुपांतर होण्याची वाट बघत आहेत काय ? असा संतप्त प्रश्न स्थानिक नागरिकांमधून उपस्थित होऊ लागला आहे.
प्राप्त माहितीनुसार प्रकाशा येथे लहान बालकांमध्ये सर्दी, खोकला, तापाचे प्रमाण अधिक आहे. स्थानिक डॉकटरांकडून दोन-तीन दिवसांचे औषध उपचार घेतात, खाजगी डॉक्टरांचा सल्ला घेऊन रक्ताची तपासणी करून घेतात आणि  डेंग्यू किंवा मलेरियाचा रिपोर्ट आला म्हणून बाहेर दुसऱ्या खाजगी रुग्णालयांकडे उपचारासाठी जातात. काही रुग्णांच्या बाबतीत असे घडले असल्याचे कळते. गेल्या आठवड्यात बाजार परिसरातील अशाच एका दहा वर्षीय आश्र्विनी आंबालाल कोळी नामक मुलीला डेंग्यू सदृष्य आजाराची लागण झाली. तिला येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. परंतु सुविधांअभावी पालकांनी तिला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
या रुग्णांचा तपासणी रिपोर्ट पोझीटीव आल्याने तात्काळ या परिसरात प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर विवेक बावस्कर यांनी पहाणी केली. त्या भागात त्यांना डेंग्यूच्या आळ्या आणि 10 रुग्ण आढळल्याचे समजते. परकोठा भागात 4, आठवडे बाजार भागात 3, कोळीवाडा भागांत 2, सिद्दार्थ नगर भागात 3 व इतर भागात असे एकूण 20 रुग्ण सध्या बाहेर गावी उपचार घेत आहेत, असे समजते.
दक्षतेचा आणि उपाय योजनेचा भाग म्हणून त्या भागातील सर्व रहिवाश्यांना कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन आरोग्य अधिकारी डॉ बावस्कर यांनी केले. त्या परिसरातील अडगळी पडलेले टायर, माठ, पाण्याचे भांडे, टँकर आदी ठिकाणी साफ सफाई करण्याचा सल्ला दिला. दरम्यान, आंबालाल कोळी यांचे म्हणणे आहे की त्यांनी स्थानिक प्रशासन म्हणून ग्रामसेवकांना भ्रमणध्वनीद्वारे या परिसराची माहिती दिली. या भागात धूरफवारणी करण्याची मागणी देखील केली. परंतु आठवडा उलटल्यावरही ग्रामसेवक स्तरावरून कोणतीही कृती झालेली नाही. या भागात आजपर्यंत  कोणीच आले नाही, असे कोळी यांचे म्हणणे आहे. डॉक्टर विवेक बावस्कर यांनी सांगितले की डेंग्यूचे रुग्ण सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!