धुळे – चक्क संरक्षण खात्याचे बनावट दस्तऐवज तयार करून मिलिटरी कॅम्पच्या कॅन्टीनमध्ये अवैध बनावट मद्य साठा विकण्याचा प्रताप उघडकीस आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या तस्करांकडून थोडाफार नव्हे तर तब्बल 1 कोटी 40 लाख रुपयांचा मद्यसाठा प्राप्त झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक शिवाजी बुधवंत यांनी पथकासमवेत ही धडाकेबाज कारवाई केली.
मुंबई-आग्रा महामार्गावर मोहाडी उपनगर परिसरातील टोलनाक्यावर असलेल्या कलकत्ता पंजाब ढाब्याच्या पाठीमागे मोकळ्या पटांगणात कंटेनर क्रमांक आरजे 14 जीएफ 94 46 हा संशयित रित्या उभा होता. ही माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक शिवाजी बुधवंत यांनी अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांना दिली. त्यांनी पथकासह जाऊन दीपक धरमवीर सिंग (रा.राजस्थान) आणि मोहम्मद दानिश मोहम्मद गौस (रा.उत्तर प्रदेश) या दोघांना ताब्यात घेत चौकशी केली असता या दोघांनी कंटेनर मधील मद्यसाठा नाशिकच्या मिलिटरी कॅम्प(कॅन्टीनचा) असल्याचे सांगितले. हा मद्याचा साठा जयपूर राजस्थान येथील मिलिटरी कॅम्प येथून भरल्याचे सांगत संरक्षण खात्याचे दस्तऐवज व बिल सादर केले. मात्र या दोघांचे वर्तन संशयास्पद वाटत असल्याने पोलीस पथकाने कंटेनर ताब्यात घेऊन पोलिस अधीक्षक कार्यालयात आणला. अधिक तपास केला असता त्यांना धक्काच बसला व हा सर्व बनावट प्रकार असल्याचे निदर्शनास आले. कंटेनरमध्ये हरियाणात तयार केलेला व त्याच राज्यात विक्रीची परवानगी असलेले मॅकडॉल व्हिस्कीचे 775 बॉक्स तसेच रॉयल चॅलेंज व्हिस्कीचे 175 बॉक्स आणि ऑल सीजन व्हिस्कीचे 50 बॉक्स आढळून आले. या मद्याची किंमत 1 कोटी 20 लाख रुपये असून कंटेनरची किंमत 20 लाख रुपये आहे. पोलिसांनी हा सर्व साठा जप्त केला असून दोघाही आरोपींना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात धुळ्यातील कोणी सहभागी आहे काय ? याचाही शोोध घेतला जात आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील, पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब सूर्यवंशी व योगेश राऊत यांच्यासह श्रीकांत पाटील, प्रभाकर बैसाने ,संजय पाटील, प्रकाश सोनार ,संदीप सरग ,संतोष हिरे, राहुल गिरी, कमलेश सूर्यवंशी, योगेश चव्हाण, मयुर पाटील आदींचा कारवाई करणाऱ्या पथकात समावेश होता.