प्रत्येक जिल्ह्यात जीम, कलादालनासह उद्यानस्मारक ऊभारा: राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष क्षीरसागर

     नाशिक – स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने प्रत्येक जिल्ह्यात उद्यान स्मारक उभे करून यामध्ये जेष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्राची उभारणी, व्यंगचित्र केंद्र, ओपन जीम, कलादालन, जिल्ह्यातील प्रसिध्द खाद्य पदार्थाचे स्टॉल अशा सर्व समावेशक बाबींचा त्या उद्यान स्मारकात समावेश करण्यात यावा. सदर उद्यान स्मारकाचे विकासकाम जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून करावे, असे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी आढावा बैठकीत सांगितले.
          विभागीय आयुक्त कार्यालयाच्या नियोजन सभागृहात नाशिक महसूल विभागातील नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव आणि नंदुरबार या पाच जिल्ह्यातील जिल्हा नियोजन समिती अंतर्गत जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून करण्यात आलेल्या कामांची आढावा बैठक राजेश क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त राधागृष्ण गमे, नाशिक जिल्हाधिकारी सूरज मांढरे, धुळे जिल्हाधिकारी जलज शर्मा, नंदुरबार जिल्हाधिकारी मनीषा खत्री, पोलीस अधीक्षक (ग्रामीण) सचिन पाटील, नाशिक जि. प. च्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, अहमदनगर जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, धुळे जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी अपर जिल्हाधिकारी जळगाव प्रवीण महाजन, उपायुक्त (नियोजन) प्रशांत पोतदार, उपायुक्त (महसूल) गोरक्ष गाडीलकर आणि जिल्ह्याचे नियोजन अधिकारी व विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
     यावेळी सन 2018 ते सन 2020-21 या वर्षांमध्ये घेण्यात आलेल्या नाविन्यपूर्ण योजनांचा आढावा घेण्यात आला. तसेच 2020-21 व सन 2021-22 या आर्थिक वर्षात शासन निर्णयानुसार जिल्हा वार्षिक योजनेमधून कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेंतर्गत झालेल्या कामांचा आणि खर्चाचा जिल्हानिहाय व यंत्रणानिहाय क्षीरसागर यांनी आढावा घेतला.
विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी नाशिक विभागाचा जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत घेण्यात आलेल्या कामांची माहिती दिली. तसेच प्रत्येक जिल्ह्यात करण्यात आलेल्या ऑक्सिजन प्रकल्पांची व त्यामाध्यमातून निर्माण होणाऱ्या ऑक्सिजन क्षमतेची माहिती दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!