वाचकांचे मत:
प्रथा-परंपरांविषयी विकल्प निर्माण
करणाऱ्यांपासून सर्वांनी सावध रहावे !
प्रति
मा.संपादक
श्राद्ध घालणे चुकीचे व अनावश्यक लेखून पुढारलेपण दाखवण्याचे सध्या नवे फॅड आले आहे. ‘पूर्वजांचे स्मरण रहावे, म्हणून छोटी छोटी पुस्तके छापा. त्यांच्या स्मरणार्थ विधायक कार्य करा. शाळा, वाचनालय, वैद्यकीय सेवा, सामाजिक काम करणार्या संघटनांना साहाय्य करा. जुनी वहिवाट पूर्ण बंद करून नवीन चालू करा, म्हणजे समाजात नवीन चांगल्या प्रथा निर्माण होतील’, असा अपप्रचार काही बुद्धिप्रामाण्यवाद्यांकडून पितृपक्ष काळात केला जात आहे. पुस्तके छापण्यासाठी किंवा सामाजिक कार्य करण्यासाठी कोणाची आडकाठी नाही; पण त्यासाठी ‘श्राद्धपक्षाला फाटा द्या’ हा कुठला तर्क ? ‘श्राद्धाऐवजी सामाजिक कार्य करा’, असे म्हणणे ‘एखाद्या रुग्णावर शस्त्रक्रिया करण्याऐवजी त्या पैशांतून सामाजिक कार्य करा’, असे म्हणण्याएवढे हास्यास्पद आहे. अध्यात्म हे अनुभूतींचे शास्त्र आहे. अनुभूती येण्यासाठी तो तो विधी अथवा आज्ञा श्रद्धेने करावी लागते. ती न करताच फाटे फोडत बसणे; म्हणजे ‘साखरेची चव घेण्याची वृत्ती न ठेवताच ‘साखरेची गोडी पटवून द्या’, असे आवाहन करण्यासारखे आहे. तथाकथित पुरोगामी मंडळी हिंदु धर्मातील प्रथा-परंपरा यांवर सातत्याने द्वेषमूलक टीका करून श्राद्धाविषयी सामान्य हिंदूंमध्ये विकल्प निर्माण करत आहेत.