‘मातृत्वाची साधना’, ‘सानेगुरुजी’ पुस्तकाचे थाटात प्रकाशन
नंदुरबार – साने गुरुजींनी ‘ प्रेमधर्म ” शिकवला. परंतु दुर्दैवाने हा प्रेमधर्म कमी होऊन द्वेषधर्म त्याची जागा घेत आहे. म्हणून ‘ खरा तो एकची धर्म ‘ या संदेशाचे पाईक होत साने गुरुजींच्या साहित्याला अभ्यासण्यासून समाज मनाची खोलवर नांगरणी करण्याची नितांत गरज असल्याचे मत ज्येष्ठ साहित्यिक प्रा. पीतांबर सरोदे यांनी मांडले.
‘मातृत्वाची साधना’ हे प्रा.पीतांबर सरोदे लिखित व दिवंगत ज्येष्ठ गांधीवादी साहित्यिक प्राध्यापक मु.ब. शाह यांच्या ‘सानेगुरुजी’ या पुस्तकाचे प्रकाशन माजी आमदार श्री राजवर्धन कदमबांडे यांच्या उपस्थित धुळे येथे संपन्न झाले. या कार्यक्रमाप्रसंगी समाजाच्या बदलत्या अभिव्यक्ती व अभिरुची बाबत प्रा. सरोदे यांनी चिंतायुक्त मत मांडले.यावेळी ज्येष्ठ विचारवंत माजी प्राचार्य श्री. विश्वास पाटील, शहीद स्मृतीचे कार्यवाह प्रा.श्री राजेंद्र शिंदे,माजी प्राचार्य चंद्रमा पाटील, श्रीमती राजश्री शाह,प्रा. जसपालसिंग राजपूत,सौ.कुंदा सरोदे आदी मान्यवर उपस्थित होते.
हा कार्यक्रम महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा पुणे च्या उत्तर महाराष्ट्र विभागीय कार्यालय, धुळे येथील दालनात घेण्यात आला.या कार्यक्रमाप्रसंगी ज्येष्ठ विचारवंत श्री विश्वास पाटील यांनी पूज्य साने गुरुजी व महात्मा गांधी यांच्या कार्याला व विचारांना उजाळा देऊन नव्या पथकांची निर्मिती होणे आवश्यक असल्याचे मत मांडले. साने गुरुजी व महात्मा गांधी यांचे ग्रंथ हेच त्यांच्या जीवनाची शिकवण आहेत. महात्मा गांधी यांचा ‘ हिंद स्वराज्य ‘ हा ग्रंथ मानवजातीचा 100 वर्षांपूर्वी लिहिलेला जाहीरनामाच आहे. वाचन संस्कृती वाढली पाहिजे. साने गुरुजी व महात्मा गांधी या महामानवांनी आयुष्यभर ग्रंथांचे वाचन केले व स्वतःचे आयुष्य घडवले. तद्वतच आजच्या काळातही ग्रंथ वाचनातून मानव समृद्ध होण्याची अपेक्षा आहे, असे चिंतन त्यांनी मांडले.सूत्रसंचालन श्री जगदीश देवपूरकर यांनी केले. प्रा.अभिजीत सरोदे यांना राजवर्धन कदमबांडे यांच्याहस्ते गौरविण्यात आले.