नंदुरबार – पश्चिम खान्देश भिल्ल सेवा मंडळ संचलित एकलव्य विद्यालय व ज.ग. नटावदकर कनिष्ठ महाविद्यालयाच्या सर्व सोयींनी युक्त, आधुनिक स्थापत्यशास्त्राच्या आधारे उभारण्यात आलेल्या नूतन इमारतीचा विद्यार्थ्यार्पण सोहळा घटस्थापनेच्या मुहूर्तावर आयोजित करण्यात आला आहे. वायर कट ब्रिक्स चा वापर करून आधुनिक स्थापत्यशास्त्राच्या आधारे उभारण्यात आलेल्या या चार मजली नूतन इमारतीचा ‘हेरिटेज’ लूक सध्या चर्चेचा विषय बनला असून शहरातील प्रमुख आकर्षक इमारत म्हणून तिची गणना होत आहे.
संस्थेच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांच्या आणि आजी-माजी विद्यार्थ्यांच्या आर्थिक सहकार्यातून ही भव्य प्रशस्त इमारत साकारण्यात आलेली आहे. गोधरा येथून या आधुनिक विटा आणण्यात आलेल्या आहेत. हे या इमारतीचे विशेष आहे.
हा इमारतीचा विद्यार्थ्यार्पण सोहळा महाराष्ट्र राज्याचे माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्राचे आदि वासी विकास विभागाचे मंत्री ना. डॉ. विजयकुमार कृष्णराव गावीत यांच्या हस्ते २६ सप्टेंबर, २०२२ वार सोमवार (घटस्थापना) रोजी संपन्न होत आहे. नासिक पदवीधर मतदार संघाचे माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, सुरतचे जीएसटी कमिशनर प्रमोद अभिमन्यू वसावे, विधान परिषदेचे माजी सदस्य चंद्रकांत रघुवंशी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत संस्थेच्या वतीने संतोष पाटील यांनी संस्थेच्या वाटचालीची थोडक्यात माहिती दिली.
संस्थेचे विद्यमान अध्यक्ष डॉक्टर सुहास नटावदकर यांनी आज पत्रकार परिषदेत याविषयी माहिती देताना सांगितले की, आज भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी वर्ष साजरा होत असताना ‘पश्चिम खान्देश भिल्ल सेवा मंडळ’ नवनिर्माणाच्या दिशेने एक पाऊल टाकत आहे. सर्व सोयींनी युक्त, आधुनिक स्थापत्यशास्त्राच्या आधारे परिपूर्ण नूतन इमारत विद्यार्थ्यार्पण करी असतांना विलक्षण आनंदाची अनुभूती घेत आहोत. कोणतीही इमारत ही भौतिकदृष्ट्या दगड विटांनी बनते, पण ही वास्तू नैतिकतेच खांब, मेहनतीचे सिमेंट, आणि लाखमोलाची वीट आणि पश्चिम खान्देश भिल्ल सेवा मंडळ परिवाराचे स्नेहबंधन यांच्या संयोगात् तयार झाली आहे. आज आपणांस या वास्तूचे लौकिक दर्शन होत आहे. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या उक्तीप्रमाणे ‘इवलेसे रोप लावियेले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी’ याचा प्रत्यय याची देही याची डोळा आपण सर्वजण घेत आहोत. आजही गुणवत्तेशी आम्ही तडजोड केलेली नाही विद्यार्थ्यांना अधिकाधिक सुविधा देतानाच सर्वांगीण शिक्षण देण्यावर आम्ही आग्रही आहोत. प्राचार्य डॉक्टर सुहासिनी नटावदकर आणि संचालक मंडळातील सदस्य तसेच समिती प्रमुख शिक्षक पत्रकार परिषदेत उपस्थित होते.
संस्थेची शताब्दी कडे वाटचाल..
कै. नानासाहेब ठकार व कै. जयंत गणपत नटावदकर यांनी नंदुरबार जिल्ह्यातील पाड्यापाड्यांवर जाऊन आदिवासी जनतेला शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले आणि अपार मेहनतीनंतर शिक्षण ही काळाची गरज आहे. याचे महत्त्व समाजातील लोकांना पटवून देण्यात ते यशस्वी झाले. इ.स १९३८ पासून पश्चिम खान्देश भिल्ल सेवा मंडळाच्या अनेक प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा, विद्यालये, कनिष्ठ महाविद्यालये, वसतिगृहे यांचा डोलारा हा कधी गळणाऱ्या कौलारु खोल्या, कधी पत्र्याचे शेड, तर कधी बांबूच्या वर्गखोल्या, कधी कुडाच्या भिंती असलेल्या वर्गखोल्या यांचा आधार घेऊन तग धरत राहिल्या. पण गुणवत्ता व पारदर्शकपणा यांच्याशी मात्र संस्थेने कधीच तडजोड केली नाही. शिक्षण क्षेत्रातील देवाणघेवाणीच्या बजबजपुरीतही सिद्धांताला संस्थेने क तिलांजली दिली नाही, हे वाखाणण्याजोगे आहे. पश्चिम खान्देश भिल्ल सेवा मंडळ हे एका संस्थेचे नाव राहिले नसून, ते अनेक कुटुंबांचा नव्हे समाजाचा आधारवड आहे. पश्चिम खानदेश भिल्ल सेवा मंडळ स्थापनेपासूनची 86 वर्ष पूर्ण करत असून शताब्दी कडे वाटचाल करीत आहे. आज या संस्थेच्या आश्रम शाळा विद्यालय आणि महाविद्यालय स्वरूपातील दुर्गम भागापर्यंत विविध तेहतीस शाखा कार्यरत असून संस्थेचा वटवृक्ष फुलला आहे.