नंदुरबार – शहरवासीयांवर एक नया पैशाचा भार पडू न देता नवी तापी पाणी योजना अमलात आणली जाणार असताना आमचे विरोधक लोकांची दिशाभूल करणारा खोटा प्रचार करीत आहेत. धड सत्ताधारी पक्षात नाही आणि धड विरोधात नाही अशा स्थितीत असलेल्या आमच्या विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरली असल्याने ते असं वाचाळपणा करत आहेत. तथापि विरोधक कोर्टात गेले तरीही आम्ही नवी तापी योजना आणणारच; अशा शब्दात आदिवासी विकास मंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित आणि भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय प्रवक्त्या डॉक्टर हिनाताई गावित यांनी रात्री उशिरा घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
मागील दोन वर्षापासून नंदुरबार शहरातील नगरपालिकेच्या माध्यमातून पुरेसा पाणीपुरवठा केला जात नसल्यामुळे लोकांना हाल सोसावे लागत आहेत कधी तीन दिवसात कधी चार दिवसात पाणी सोडले जात असतानाच यंदाच्या उन्हाळ्यात संपूर्ण शहराने दुष्काळ अनुभवला. असे असताना एकनाथराव शिंदे गटाच्या शिवसेनेचे संपर्क नेते माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केले आहे की, ही नवी योजना महागात पडेल म्हणून ते शेवटपर्यंत विरोध करत राहतील. या सर्व पार्श्वभूमीवर मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी निखिल पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केले की, नंदुरबार शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असून शहरवासीयांना शुद्ध पाणी मिळावे, पुरेशा प्रमाणात पाणी मिळावे, या हेतूने 200 कोटी रुपये खर्चाची नवी तापी पाणी योजना आखली आणि राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला.
आदिवासी विकास मंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित आणि भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय प्रवक्त्या डॉक्टर हिना गावित यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितले की, नंदुरबार शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या वीरचक धरणाला लागून बांधलेल्या अवैध फार्म हाऊस मध्ये पाणी घुसू नये म्हणून रघुवंशी हे अधिकाऱ्यांना फोन करतात आणि धरण पूर्ण क्षमतेने भरू देत नाहीत. त्यामुळेच नंदुरबार शहरवासीयांना दोन वर्षापासून तीन-चार दिवसाआड पाणी सोडले जात आहे. हे अवैध फार्म हाऊस पाडण्याचे आदेश न्यायालयाने दिलेले आहेत असे असताना रघुवंशी हे लोकांची दिशाभूल करतात. तथापि कोणत्याही परिस्थितीत नंदुरबार शहराला शुद्ध आणि पुरेसा पाणीपुरवठा व्हावा म्हणून नवीन तापी पाणी योजनेचा प्रस्ताव शासनाकडे ठेवण्यात आला असून विरोधक कोर्टात गेले तरीही आम्ही योजना साकार करून दाखवणारच; या शब्दात गावित यांनी ठाम निर्धार व्यक्त केला.