सूचना – कृपया कोणीही मजकूर कॉपी-पेस्ट करू नये
नवापुर तालुक्यातील विसरवाडी भागातील कॉंग्रेस पक्षाचे निष्ठावान प्रमुख कार्यकर्ते बकाराम गावित हे कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देत रविवार दि.७ नोव्हेंबर २०२१ रोजी शिवसेना पक्षात प्रवेश करीत आहेत. शिवसेनेचे जिल्हा नेते माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी व जिल्हाप्रमुख डॉ.विक्रांत मोरे यांच्या उपस्थितीत होणार्या सोहळ्यात बकाराम गावित हे शेकडो कार्यकर्त्यांसमवेत शिवबंधन बांधणार आहेत. माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या नेतृत्वात शिवसेनेला बेरजेचे राजकारण करण्यात मिळत असलेले यश पुढच्या काळात कॉंग्रेसला क्षतीग्रस्त करण्याबरोबरच भाजपालाही चिंता वाढवणारे ठरू शकते; याचे संकेत देणारी ही घटना मानली जात आहे.
कारण बकाराम गावित यांचा शिवसेनेत प्रवेश होण्यामागे शिवसेनेचे जिल्हा नेते माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी चालवलेले बेरजेचे राजकारण कारणीभूत मानले जाते. जिल्हापरिषदेच्या नुकत्याच झालेल्या पोटनिवडणूक प्रसंगी नंदुरबार तालुक्यात चंद्रकांत रघुवंशी यांच्या या फॉर्म्युल्याचे परिणाम थेट मतपेटीवर पहायला मिळाले. रघुवंशी यांचे कालचे कट्टर विरोधक आज कट्टर समर्थक बनून फिरत आहेत. पुढील मेगा भरतीचा हा ट्रेलर असून भाजपाला असेच भगदाड पडणार असल्याचे रघुवंशी समर्थक म्हणतात. रघुवंशी हे शिवसेनेत असले तरी प्रत्येक तालुक्यातील कॉंग्रेसपक्षीय नगरसेवक, सरपंच आणि अन्य पदाधिकार्यांमधे त्यांचे समर्थक अद्याप मोठ्यासंख्येने आहेत. त्यातील काही समर्थक आता उघडपणे शिवसेेनेत यायला इच्छूक असू शकतात. शिवाय भाजपामधूनही काही नाराज सरपंच आणि काही नाराज पदाधिकारी संख्येने वाढले आहेत. ते पहाता भगदाड पडणार असल्याचा दावा लोकांना खरा वाटतो. तथापि सेटलमेन्टचे दुसरे नाव राजकारण, हे तंत्र दिल्लीपासून धडगाव पर्यंत सगळ्यांनाच उमगले आहे. त्यामुळे कोण केव्हा कुठे जाईल याचा नेत्यांना आणि कार्यकर्त्यांनाही अंदाज येईनासे झाले आहे. बकाराम गावित यांच्या पक्षांतराकडे त्याच दृष्टीने पाहिले जात आहे.
२०१९मधे भाजपाने केलेल्या मेगाभरती प्रसंगी नवापूर तालुका कॉंग्रेसला मोठे खिंडार पडले होते. नंदुरबार जिल्हा कॉंग्रेसचे प्रमुख आधार स्तंभ मानले जाणारे माजी खासदार माणिकराव गावित यांचे सुपूत्र तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भरत गावित शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह कॉंग्रेसला सोडून भाजपात सामिल झाले होते. त्या पाठोपाठ आता बकाराम गावित यांच्या माध्यमातून नवापूर कॉंग्रेसला पुन्हा मोठे खिंडार पडणार आहे. कॉंग्रेसचे माजी मंत्री तथा ज्येष्ठ जिल्हा नेते सुरुपसिंग नाईक हे वयोमानामुळे सध्या सक्रिय नाहित. परिणामी त्यांच्या नेतृत्वाची धुरा आमदार शिरिष नाईक यांच्या खांद्यावर आहे. एनडीबी न्यूज वर्ल्ड शी बोलतांना बकाराम गावित यांनी याकडे लक्ष वेधून सांगितले की, मी कॉंग्रेस पक्षाचा निष्ठावानच होतो. परंतु ज्यांना माझे नेते मानतो ते सुरुपसिंग नाईक, माणिकरावदादा हे दोन्ही नेते निवृत्त झाले असून त्यांच्या जागी आलेले युवा नेते आमच्या अपेक्षांना आणि कार्यालाही न्याय देण्यात सातत्याने कमी पडत आहे. कॉंग्रेसमधे मी नेता मानायचो असे तिसरे व्यक्ती होते ते चंद्रकांत रघुवंशी. ते सध्या शिवसेनेत आहेत. तेच माझ्या भागातील कामांना न्याय देतील, असा विश्वास वाटून मी आता शिवसेनेत प्रवेश करीत आहे; असे बकाराम गावित म्हणाले. मला हिंदुत्वाच्या विचारधारेची अडचण येण्याचा प्रश्नच उदभवत नाही कारण मी मुळातच शिवसेनेतून घडलो आहे; असेही बकाराम गावित यांनी स्पष्ट केले.
या विषयीची थोडक्यात पार्श्वभुमी अशी की, बकाराम गावित हे १९८६ सालापासून शिवसेनेत होते. त्यांची कामाची धाटणी परिणामकारक होती. दूरवरच्या परिणामांना लक्षात घेऊन माणसे पारखण्यात माहिर असलेले कॉंग्रेसचे तत्कालीन मंत्री तथा ज्येष्ठ नेते सुरुपसिंग नाईक यांनी बरोबर हेरले आणि बकाराम गावित यांना कॉंग्रेसमधे प्रवेश करायला लावला. तेव्हापासून बकाराम गावित हे कॉंग्रेसचे पाईक बनले. त्याहीपेक्षा ज्येष्ठ नेते सुरुपसिंग नाईक आणि माजी खासदार माणिकराव गावित यांचे खरे निष्ठावान, अशीच त्यांची प्रतिमा बनली. ती आज ३२ वर्षानंतरही कायम आहे. तथापि असे असतांनाही ते कार्यकर्त्यांसमवेत आज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. बकाराम गावित यांचे हे पक्षांतर म्हणजे एखाद्या प्रकरणाची सेटलमेन्ट असू शकते, असा संशय काही कॉंग्रेसप्रेमी व्यक्त करतात. बकाराम गावित कॉंग्रेसमधून बाहेर पडणार, हे आता जाहीर होत असले तरी पक्षातील कार्यकर्त्यांना मात्र एक वर्ष आधीपासूनच ही शक्यता जाणवत होती. याचा अर्थ नेत्यांनाही वर्षभरापासून या घटनेचा अंदाज असावा. बकाराम गावित यांच्या समवेत खांडबारा, चिंचपाडा परिसरातील कोणते व किती कॉंग्रेस कार्यकर्ते खरोखर शिवसेनेत जातात, हे कार्यक्रम प्रसंगी पहायला मिळेल. तथापि शिवसेनेची व्याप्ती वाढवणारी ही घटना आहे, एवढे निश्चित.