बनारस हिंदु विश्‍वविद्यालय विद्यार्थ्यांना  शिकवणार वैदिक काळातील कायदे 

वाराणसी –  बनारस हिंदु विश्‍वविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना वैदिक काळातील कायदे शिकवण्यात येणार आहेत. या विश्‍वविद्यालयाच्या वैदिक विज्ञान केंद्रामध्ये येत्या नोव्हेंबर मासापासून वैदिक विधी शास्त्राचा एक वर्षाचा अभ्यासक्रमही चालू होत आहे.
   सध्याच्या कायद्यांमधील पळवाटांमुळे गुन्हेगार सुटतात; पण प्राचीन भारतीय न्यायव्यवस्थेत असे होणे शक्य नव्हते. हे लक्षात घेऊन बनारस विश्वविद्यालयाने हा निर्णय घेतल्याचे म्हटले आहे.
हा अभ्यासक्रम देशभरातील कायदेतज्ञांच्या मार्गदर्शनाखाली सिद्ध करण्यात आला आहे.  या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून वेदांच्या आधारावार कायदा आणि सुव्यवस्था कशी राखायची, हे शिकवण्यात येणार आहे. या अभ्यासक्रमामध्ये वेदांवर आधारित न्यायाप्रणालीसह नैतिक शिक्षणाचाही समावेश करण्यात आला आहे.
    वैदिक विज्ञान केंद्राचे समन्वयक प्रा. उपेंद्र त्रिपाठी यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, आज कायद्याच्या मर्यादित व्याख्येमुळे नैतिकतेच्या आधारावर योग्य न्याय मिळत नाही. या त्रुटीवर भारताचा वैदिक ग्रंथ ‘न्याय मिमांसे’च्या आधारे कशा प्रकारे तोडगा काढता येऊ शकतो, हेही या अभ्यासक्रमातून शिकवण्यात येणार आहे.
    ‘न्याय मीमांसे’च्या १ सहस्र श्‍लोकांमध्ये अत्यंत विधीवत पद्धतीने न्यायव्यवस्थेचे सूत्रे मांडण्यात आली आहेत. विद्यार्थ्यांना या श्‍लोकांचा अर्थ सांगून ते शिकवण्यात येतील. कोणत्याही प्रकरणामध्ये वैदिक न्यायाच्या आधारावर कुठला निर्णय घेता येऊ शकतो, हे शिकण्यात येईल’, असे वैदिक विज्ञान केंद्राचे समन्वयक प्रा. उपेंद्र त्रिपाठी यांनी सांगितले.
    वैधिक विधी शास्त्रामध्ये न्याय मिमांसा, राजधर्म, सुशासन यांविषयी विस्तृत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच संस्कृतचे शब्द, कर्तव्यावर आधारित न्याय, कौंटुबिक कायदे, वैवाहिक संबंध, पितृत्व, संतती, दत्तक पुत्र विधी, संयुक्त हिंदु परिवार, उत्तराधिकारी विधी, हिंदु महिलांचा मालमत्ता अधिकार इत्यादी सूत्रांवर विस्तृत शिक्षण दिले जाणार आहे. ‘सनातन प्रभात’ या दैनिकात हे वृत्त प्रसिद्ध झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!