(मिलिंद चवंडके)
नगर – अस्तित्वात नसलेल्या सुमारे १३ पुरवठादार कंपन्यांच्या नावे बनावट व्यवहार दाखवून हैदराबाद येथील एका बड्या कंपनीने केलेला बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट ५.०६ कोटी रुपयांचा घोटाळा उघड करण्याची दबंग कामगिरी नगरचे सुपुत्र तथा सीजीएसटीचे उपायुक्त रोहित जोशी यांच्या नेतृत्वात पार पडली. सलग अशा मोठ्या कारवायांमुळे उपायुक्त रोहित जोशी यांचे नाव चर्चेत आले आहे.
हैदराबाद येथील मेसर्स डीम डिस्ट्रिब्युटर्स प्रा.लिमिटेडवर बनावट इनपुट टॅक्स क्रेडिटचा (ITC) कथित लाभ आणि वापर केल्याचा आरोप आहे. म्हणून देशभरातील विविध जीएसटी आयुक्तालयांमार्फत मेसर्स डीम डिस्ट्रिब्युटर्सच्या पुरवठादारांची चौकशी सुरू आहे. नागरदेवळ्याचे सुपुत्र तथा सध्या हैद्राबाद येथे शासनाच्या कस्टम खात्यात डेप्युटी कमिशनर म्हणून कार्यरत असलेले रोहीत प्रकाश जोशी यांच्या नेतृत्वाखाली CGST रंगारेड्डी आयुक्तालयाच्या preventive शाखेने या प्रकरणी तपास हाती घेतला. दरम्यान तपासात उघड झाले आहे की, अशा सुमारे १३ पुरवठादार कंपन्या आहेत ज्या प्रत्यक्षात अस्तित्वात नाहीत व त्यांनी पुरवठा न करता बनावट पावत्या पुरविल्या आहेत. मेसर्स डीम डिस्ट्रिब्युटर्स यांनी बनावट पावत्यांच्या बळावर इनपुट टॅक्स क्रेडिटचा लाभ घेतला आणि हे क्रेडिट विविध कंपन्यांना बोगस पावत्यांच्या मदतीने पुढे पाठवले आहे.
आजपर्यंत या प्रकरणातील एकूण बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट ५.०६ कोटी रूपये आहे. जो सीजीएसटी कायद्याच्या कलम १३२ च्या तरतुदी अंतर्गत दखलपात्र गुन्हा आहे. कंपनीचे संचालक श्री. संजयकुमार अग्रवाल यांनी कबूल केले आहे की, त्यांनी वास्तविक वस्तूंचा पुरवठा न करता केवळ कमिशन मिळवण्यासाठी इनव्हॉइसमध्ये व्यवहार केला होता. त्यानुसार कंपनीचे संचालक श्री. संजयकुमार अग्रवाल यांना अटक करण्यात आली. त्यांना आर्थिक गुन्हे न्यायालय, नामपल्ली, हैदराबाद यांच्यासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने १४ दिवस न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास चालू आहे. फसवणूक करणाऱ्या कंपन्यांची ओळख पटवून कठोर कारवाई करण्याचे सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. अशापध्दतीने फसवणूक करणाऱ्यांवर जीएसटी कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई केली जाईल, असे उपायुक्त श्री. रोहीत जोशी यांनी सांगितले. या कारवाईचे वृत्त भिंगारमध्ये येताच जोशी कुटूंबियांसह रोहितचा वर्गमित्र सर्वश्री महेंद्र साळवे, सौरभ ठोंबरे, सचिन कराळे, नितीन नाशिककर, आशुतोष फळे आदींनी आनंद व्यक्त करत रोहितशी फोनवर संपर्क साधून अभिनंदनाचा वर्षावच केला.
श्री. रोहित जोशी यांनी या अगोदर राजीव गांधी एअरपोर्ट येथे ३.९६ करोड व ९८ लाख रुपये किंमतीचे परदेशी चलन तसेच ६.५ किलो सोने जप्त करण्याची कारवाई केली होती. श्री. रोहित जोशी यांनी कस्टम खात्यात रूजू झाल्यापासून निस्सीम देशभक्तीच्या भावनेतून असंख्य धडाकेबाज कारवाया केलेल्या असल्याने हैद्राबाद शहरामध्ये त्यांची एक दबंग अधिकारी म्हणून ओळख निर्माण झाली आहे. श्री. रोहित जोशी हे मूळचे भिंगार येथील नागरदेवळे भागातील रहिवासी आहेत. इयत्ता दहावीपर्यंतचे त्यांचे शालेय शिक्षण अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या भिंगार हायस्कूलमध्ये झालेले आहे. तसेच उच्च माध्यमिक शिक्षण नगरमधील रेसिडेन्सीयल जुनियर कॉलेज येथे झालेले आहे. त्यानंतर त्यांनी पुणे येथील पुणे विद्यार्थी गृह या इंजिनिअरिंग कॉलेजमधून इंजिनिअरिंग केले. देशभक्तीच्या भावनेतून कार्य करणारे अधिकारीच भ्रष्टाचार निपटून काढू शकतात, असे जनतेमधून बोलले जात आहे.