जळगाव – जामनेर तालुक्यातील फत्तेपुर रोडवरील तोरणाळा घाटातील पठाडतांडा फाट्याजवळ रात्री १ वाजेच्या सुमारास ‘भूत’ असल्याचा बनावट व्हिडिओ तयार करून सोशल मिडियाद्वारे प्रसारित करण्यात आला. लोकांमधे भिती निर्माण करणारे हे प्रकरण बुवाबाजीशी संबंधीत असल्याचे निष्पन्न झाले असून या प्रकरणी तीन जणांविरोधात पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, देऊळगाव (गुजरी) येथील जमील शहा अय्युब शहा उर्फ सलमान बाबा हा देऊळगाव येथे बुवाबाजी करतो. काही दिवसांपूर्वी त्याने ताईत आणि गंडेदोरे विक्रीसाठी आणले आहेत. या ताईतांची विक्री व्हावी म्हणून गावातील तरूणांना हाताशी घेऊन उपरोक्त व्हिडिओ बनवला, असे स्थानिकांंचे म्हणणे आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुद्दाम प्रसारित केलेल्या त्या व्हिडिओत शिर नसलेले धड चालतांना दर्शवले असून त्या विशिष्ट ठिकाणी व रस्त्यावर भुताटकी असल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला आहे. या माध्यमातून भिती पसरविण्याचा प्रयत्न करण्यात आला म्हणून दखल घेण्यात आली. तपासाअंती असे स्पष्ट झाले की, महिलेचा वेश धारण करून सहकारी तरूणच उलट चालतांनाचे चित्रिकरण करण्यात आले. प्रत्यक्षात अंधारात चेहर्यावर काळे कापड लावल्याने डोके नसून केवळ धड चालत असल्याचा भास होत आहे. धडाशिवाय दिसणार्या मुलासोबत दिसत असलेली महिला ही मुळात महिला नसून तरुणानेच साडी नेसलेली आहे. त्याचे तोंड मात्र कॅमेर्याच्या विरुद्ध दिशेने ठेवण्यात आले आहे. व्हिडिओ पाहून फत्तेपूर पोलिसांनी २४ सप्टेंबरला रात्री तिघांना ताब्यात घेतले. २५ ला पहूर पोलिसांच्या स्वाधीन करत पोलीस हवालदार राहुल जोहरे यांच्या फिर्यादीवरून पहूर पोलीस ठाण्यात तिघांविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. सलमान बाबासह गोपाळ तंवर, सतीश शिंदे यांना पोलिसांनी समज देऊन सोडून दिले आहे. पोलिसांनी या प्रकरणाशी संबंधीत वाहन चालक, मालक, विवस्र असलेला आणि साडी नेसलेला तरुण यांच्याविरोधात गुन्हा नोंदवत सर्वच दोषींवर कठोर कारवाई करायला हवी, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.