जळगाव – बांगलादेशमध्ये नवरात्रीच्या काळात अनेक ठिकाणी धर्मांधांनी अफवा पसरवून शेकडो दुर्गापूजा मंडपांवर, इस्कॉन मंदिरावर तसेच शेकडो हिंदूंवर आक्रमण केले. या हिंसाचाराचा निषेध करत ‘आक्रमण करणाऱ्या धर्मांधांवर कठोर कारवाई करण्यात यावी’, या मागणीचे निवेदन समस्त हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने १८ ऑक्टोबर रोजी जळगाव, चोपडा, भुसावळ येथील प्रशासनाला निवेदन देण्यात आले.

समस्त हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने जळगाव येथेही अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, चोपडा येथील प्रांताधिकारी सुमित शिंदे, भुसावळ येथील उपविभागीय दंडाधिकारी रामसिंग सुलाने, यावल येथील नायब तहसिलदार आर. के. पवार यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, आतापर्यंत या हिंसाचारात ४ हिंदूंना ठार मारण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. नोवाखाली येथे शुक्रवारच्या नमाजानंतर ‘इस्कॉन’च्या एका मंदिरावर २०० हून अधिक धर्मांधांनी आक्रमण केले. यामध्ये ‘इस्कॉन’ मंदिरातील दोन साधू निताई दास प्रभु आणि जतन दास प्रभु, तसेच २५ वर्षीय भाविक पार्थ दास यांची निर्घृण हत्या करण्यात आली. इस्कॉनचे उपाध्यक्ष आणि प्रवक्ते राधारमण दास यांनी सांगितले की, पार्थ दास हे बेपत्ता होते. त्यानंतर दुसर्या दिवशी त्यांचा मृतदेह तलावात तरंगतांना दिसला.

निवेदनात पुढे म्हटले आहे की वर्ष १९३० पासून आतापर्यंत प्रमुख दंगली, हत्याकांडांचा उल्लेख पाहिल्यास त्यात ‘१९३० ढाका दंगल’, ‘१९४६ डायरेक्ट ॲक्शन प्लॉन’, ‘१९५० पूर्व बंगाल हत्याकांड’, ‘१९६२ राजशाही हत्याकांड’, ‘१९६४ पूर्व पाकिस्तान हत्याकांड’, ‘१९८९ बांगलादेशातील हिंदूंचा छळ’, १९९०-१९९२ होजाई दंगल, ‘२०१० देगंगा दंगल’, ‘२०१२ हठझारी’, ‘२०१२ फतेहपूर’, ‘२०१२ चिरिरबंदर’, ‘२०१३ कॅनिंग दंगल’, ‘२०१५ नादिया दंगल’, ‘२०१६ कालियाचक दंगली’, ‘२०१७ खा मौंग सिक हत्याकांड’ आदींचा प्रमुख उल्लेख करता येईल. अनेक घटना तर लहान-सहान समजून त्याची दखल वृत्तपत्रांतही घेतली जात नाही.
निवेदनात असेही म्हटले आहे की वर्ष १९४७ मध्ये धर्माच्या आधारावर भारताची फाळणी झाली, तेव्हापासून पाकिस्तान आणि बांगलादेश (तत्कालीन पूर्व पाकिस्तान) मध्ये पद्धतशीरपणे हिंदूंचा वंशविच्छेद चालू आहे. अशा घटनांचा परिणाम म्हणजे बांगलादेशात वर्ष १९४७ मध्ये २८ प्रतिशत असलेली हिंदूंची लोकसंख्या आता केवळ ८ प्रतिशत शिल्लक आहे. अशीच परिस्थिती राहिली, तर काही वर्षांनी बांगलादेशातील हिंदु समाज संपूर्णपणे नष्ट झालेला असेल.
तरी या अनुषंगाने आम्ही मागणी करत आहोत की, जगभरात भारत हा एकमेव हिंदूंचा देश आहे. या नात्याने जगभरातील हिंदु समाजाची नैतिक जबाबदारी भारत सरकारची आहे. या दृष्टीने बांगलादेशमधील हिंदू समाजाला सुरक्षा पुरवावी, यासाठी भारत सरकारने तात्काळ बांगलादेशच्या पंतप्रधानांशी थेट संवाद साधावा. हिंदूंवर हिंसक आक्रमणे करणार्या, मूर्तींचे भंजन करणार्या, दुर्गापूजा मंडप उद्ध्वस्त करणार्या धर्मांधांना शोधून काढावे, त्यांच्यावर आणि त्यांच्या सूत्रधारांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी. भारत सरकारने पाकिस्तान आणि बांगलादेश येथील हिंदूंवरील अत्याचारांबाबत ‘संयुक्त राष्ट्रा’त मुद्दा उपस्थित करून या देशांवर दबाव निर्माण करावा.

निवेदन प्रसंगी जळगाव येथे श्री. राहुल गोटे, बजरंग दलाचे श्री. राहुल धनगर, श्री. विशाल सुरडकर, हिंदू राष्ट्र सेनेचे श्री. मोहन तिवारी, शिव प्रतिष्ठानचे श्री. राहुल जोशी, चोपडा येथे भाजप जिल्हा परिषद सदस्य गजेंद्र सोनवणे, शहर अध्यक्ष श्री. गजेंद्र जैस्वाल, चुंचाळेचे उपसरपंच श्री. शुभम चौधरी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री. राजू स्वामी, शिवसेनेचे श्री. राजाराम पाटील, बजरंग दलाचे श्री. ललित चांदवडकर, चुंचाळे ग्रामपंचायत सदस्या सौ. ज्योत्स्ना चौधरी, सामाजिक कार्यकर्ते श्री. दिलीप नेवे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. यशवंत चौधरी, सनातन संस्थेचे श्री. अनिल पाटील, भुसावळ येथे सर्वश्री मंदार जोशी, प्रवीण भोई, सचिन बडगे, भूषण महाजन, शिव प्रतिष्ठानचे श्री. रितेश जैन, गोसेवक मयूर सावकारे, इस्कॉनचे योगेश बैरागी तर यावल येथे सर्वश्री मयूर महाजन, चेतन भोईटे, धीरज भोळे, गौतम बिरारी आदी धर्मप्रेमी उपस्थित होते, अशी माहितीयाविषयी हिंदू जनजागृती समितीचे जळगाव जिल्हा समन्वयक प्रशांत जुवेकर यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.