नंदुरबार – येथील नवापूर चौफुली वर क्रांतिवीर बिरसा मुंडा यांचा तर धुळे चौफुलीवर वीर एकलव्य यांचा पूर्णाकृती पुतळा बसवून नामकरण करावे; अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय प्रवक्त्या खासदार डॉक्टर हिना गावित व माजी मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी केली.
दिनांक 15 नोव्हेंबर हा दिवस भगवान बिरसा मुंडा यांचा जन्म दिवस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तथा केंद्र सरकारने जनजातीय गौरव दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय नुकताच घोषित केला. त्या पार्श्वभूमीवर आज दिनांक १५/११/२०२१ रोजी नवापूर चौफुली नंदुरबार येथे क्रांतिवीर भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून नंदुरबार विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉक्टर विजयकुमार गावित, खासदार डॉक्टर हिना गावित, कोळदा गटाचे जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर सुप्रिया गावित यांनी अभिवादन केले. त्याप्रसंगी भाजपा तालुकाध्यक्ष दिपक पाटील, संतोष वसईकर, सुरेंद्र ठाकरे, किरण पाटील, विजय नाईक, शिवा गावीत, सोनवणे, पंकज गावीत, रवि वसावे यांच्यासह महिला व समाज बांधव उपस्थित होते.
त्यानंतर अप्पर जिल्हाधिकारी महेश पाटील व जिल्हा पोलीस अधीक्षक पी आर पाटील यांची भेट घेऊन खासदार डॉक्टर हिना गावित, आमदार डॉक्टर विजयकुमार गावित व डॉक्टर सुप्रिया गावित यांनी निवेदन सादर केले. क्रांतिवीर भगवान बिरसा मुंडा यांचा नंदुरबार शहरातील नवापूर चौफुली येथे पूर्णाकृती पुतळा बसविण्यात यावा व त्या चौकाचे ‘क्रांतिवीर भगवान बिरसा मुंडा चौक’ असे नामकरण करण्यात यावे त्याचप्रमाणे धुळे चौफुली येथे विर एकलव्य यांचा पूर्णाकृती पुतळा बसवून धुळे चौफुलीचे वीर एकलव्य असे नामकरण करण्यात यावे; अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली. निवेदन देतांना कोळदा गटाच्या जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर सुप्रिया गावित, पंकज गावीत, मनोहर पाटील हे उपस्थिथित होते.