नंदुरबार – जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधून मुंबई येथील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस फिल्ड वर्क विद्यार्थी व नंदुरबार येथील ग्रामीण श्रमिक प्रतिष्ठान संचलित स्वाधार दिव्यांग कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्रातर्फे आयोजित करण्यात आलेला ‘Celebration of Inclusion’ हा कार्यक्रम तथा दिव्यांग मेळावा तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या तसेच शहर पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. याप्रसंगी पुष्पगुच्छ अथवा बुके देऊन प्रमुख पाहुण्यांचे स्वागत सत्कार करण्याला आयोजकांनी फाटा दिला. त्या ऐवजी वृक्ष जोपासनेचा संदेश देण्यासाठी कुंडीत वाढलेल्या वृक्ष रोपांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते जल देऊन पूजन करण्याचा स्तुत्य उपक्रम आयोजकांनी या प्रसंगी राबवला.
नायब तहसीलदार रमेश वळवी, नायब तहसीलदार नितीन पाटील, नायब तहसीलदार गावित, स्वाधार केंद्र प्रमुख विनायक सोनवणे यांचीही या मेळाव्याला प्रमुख उपस्थिती होती. नंदुरबार जिल्ह्यातील अपंगत्वाच्या प्रश्नासंबंधी जनजागृती होऊन बदलासाठी चालना मिळेल, अशा स्वरूपाचे प्रबोधनात्मक मार्गदर्शन प्रमुख पाहुण्यांनी केले.
आज दिनांक 3 डिसेंबर रोजी येथील तहसील कार्यालयात संपन्न झालेल्या या कार्यक्रमात लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली. तसेच दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचा गौरव देखील करण्यात आला. जिल्ह्यातील दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. नंदुरबार जिल्ह्यातील दिव्यांगाचे प्रश्न आणि स्थिती यावर सादरीकरण सादर करण्याात आले. तसेच स्वाधार मधील विद्यार्थ्यांचे मसाज प्रात्यक्षिक आदी कार्यक्रम पार पडले.