नंदुरबार – आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करताना नियमित प्रचारसभा व स्टार प्रचारकांच्या सभेचे किमान 5 मिनिटांचे व्हिडिओ चित्रिकरण करावे. बेताल, प्रक्षोभक, वादग्रस्त व चुकीच्या वक्तव्यांचे काटेकोर चित्रिकरण करण्यात यावे. त्याचबरोबर समाजमाध्यमे व इतर माध्यामांमधून येणाऱ्या फेक न्यूजवर पोलीसांच्या सायबर क्राईम शाखेने जिल्हा माहिती अधिकाऱ्यांच्या समन्वयातून तात्काळ निराकरण करावे, असे निर्देश राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोकलिंगम यांनी दिले आहेत.
विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने नंदुरबार येथे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित अधिकारी व नोडल अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत एस. चोकलिंगम हे बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. सावनकुमार, जिल्हा पोलीस अधिक्षक श्रवण दत्त, अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, सहाय्यक जिल्हाधिकारी, (नंदुरबार) अंजली शर्मा, अनय नावंदर (तळोदा), उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रमोद भामरे, निवासी उपजिल्हाधिकारी हरिष भामरे, जिल्हा पुरवठा अधिकारी गणेश मिसाळ, जिल्हा शल्य चिकित्सक वर्षा लहाडे, उपजिल्हाधिकारी सर्वश्री गोविंद दाणेज, महेश चौधरी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अंकुश पालवे, सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त सुंदरसिंग वसावे, उपविभागीय अधिकारी (शहादा) सुभाष दळवी, तसेच सर्व तालुक्यांचे तहसीलदार, गट विकास अधिकारी, नगरपरिषदांचे मुख्याधिकारी बैठकीस उपस्थित होते.
यावेळी बोलताना श्री. एस. चोकलिंगम म्हणाले, प्रत्येक मतदाराला मतदान करणे सहज शक्य होईल याची काळजी घेणे निवडणूक प्रशासनाने घ्यावी. त्यात प्रामुख्याने दिव्यांग, वयोवृद्ध मतदारांसाठी विशेष काळजी घेण्यात यावी. प्रत्येक मतदान केंद्रावर मुलभूत सेवा-सुविधा, पाणी, प्राथमिक आरोग्य उपचारांच्या बाबतीत सतर्कता बाळगावी. आरोग्य विषयक कुठलीही आपत्ती निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी. पोलीस प्रशासनाने प्रत्येक विधानसभा क्षेत्राच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांशी समन्वयाने गर्दीचे नियोजन करावे. आंतरराज्य सीमांवरील चेकपोस्टवर रोख रक्कम व बेकायदेशीर मद्यसाठ्यांच्या वाहतुकीवर प्रतिबंधात्मक कारवाईचे सुक्ष्म नियोजन करावे. ते पुढे म्हणाले, यावेळी निवडणुक कर्तव्यावर नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांना डिजिटल ओळखपत्र देण्यात यावीत त्यासाठी लाईव्ह फोटोसह संग्रहित फोटो अपलोड करून दिल्यास ते अधिक सुलभ व गतिमानतेने होईल. निवडणूक कर्मचाऱ्यांना दिले जाणारे मानधन थेट त्यांच्या बॅंक खात्यात जमा करण्यात यावे. त्यासाठी पहिल्या प्रशिक्षणात त्यांच्याकडून बॅंक खात्याची माहिती भरून घ्यावी, टोकन रू. 1/- मात्र खात्यात जमा झाल्याची खात्री दुसऱ्या प्रशिक्षणात करून घ्यावी, अशा सूचना यावेळी श्री. एस. चोकलिंगम यांनी दिल्या.