नंदुरबार – राज्यभरात सध्या बेपत्ता महिलांचा आणि मुलींचा विषय गाजत आहे त्याचवेळी इकडे नंदुरबार जिल्हा पोलीस दलाने मागील पाच वर्षात बेपत्ता झालेल्या 1278 पैकी 1207 महिला व 263 अल्पवयीन मुलींना शोधण्यात यश मिळाल्याची माहिती दिली आहे.
नंदुरबार जिल्ह्याच्या आदिवासी भागातून मोठ्या संख्येने मुली बेपत्ता होत असल्याचे 2018 यावर्षी चर्चेत आले होते. त्या पार्श्वभूमीवर नंदुरबार जिल्हा पोलीस दलाने दिलेली माहिती महत्त्वपूर्ण आहे. अद्याप बेपत्ता झालेल्या 71 महिला आणि अकरा मुलींचा तपास लागणे बाकी असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
नंदुरबार जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणे हद्दीत सन 2018 ते सन 2022 या पाच वर्षाच्या कालावधीत एकुण 1278 महिला बेपत्ता व 274 अल्पवयीन मुलींचे अपहरण करुन पळवून घेवून गेल्याचे गुन्हे दाखल होते. त्यापैकी काही बेपत्ता झालेल्या महिला व अपहरणाच्या गुन्ह्यातील पिडीत मुली अद्यापही मिळून आलेल्या नाहीत. त्याअनुषंगाने अशा गुन्ह्यांचा गांभीर्याने तपास करुन बेपत्ता झालेल्या महिला, अपहरण करुन पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलींचा विशेष मोहिम राबवून शोध घेण्याबाबत नंदुरबार जिल्ह्य पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी गुन्हे बैठकीत सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत.
पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य मुंबई यांचेकडील आदेशान्वये दिनांक 1 जुन 2021 पासुन राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पोलीस नियंत्रण कक्षात मिसिंग डेस्क तयार करण्यात आला आहे. नंदुरबार जिल्हा पोलीस नियंत्रण कक्ष येथे मिसिंग डेस्क स्थापन करण्यात आला असून नियंत्रण कक्षाच्या मार्फतीने पोलीस ठाण्यात संपर्क करुन पोलीस ठाणे स्तरावर दाखल बेपत्ता बालके, महिला व पुरुष यांचे नातेवाईक तसेच प्रभारी अधिकारी व बेपत्ता प्रकरणातील तपासी अधिकारी यांना दररोज संपर्क करुन बेपत्ता इसमाबाबत माहिती घेण्याकरीता प्रयत्न केले जातात.
या अनुषंगाने नंदुरबार जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाणेमधील 01 पोलीस अधिकारी व 02 पोलीस अंमलदार असे एकुण 12 पोलीस अधिकारी व 24 पोलीस अंमलदारांचे पथक पोलीस ठाणे स्तरावर तयार करण्यात आलेले होते. स्थापन करण्यात आलेल्या पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी सन 2018 ते सन 2022 या पाच वर्षाच्या कालावधीत महाराष्ट्रासह, गुजरात व मध्य प्रदेश राज्यात जावून बेपत्ता झालेल्या 1278 महिलांपैकी 1207 व 274 अल्पवयीन मुलींपैकी 263 अल्पवयीन मुलींना शोधण्यात नंदुरबार जिल्हा पोलीस दलास यश आले आहे.
अपहरणाच्या गुन्ह्यांतील शोध न लागलेल्या मुलींचा शोध घेण्याकरीता नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षक कार्यालय येथे अनैतिक मानवी वाहतूक व्यापार कक्ष (AHTU) स्थापन करण्यात आला असून सदर कक्षाकडून अल्पवयीन मुलींचा शोध घेण्यात येत असतो. मागील दोन वर्षात सन 2017 पासून शोध न लागलेल्या 14 अल्पवयीन मुलींचा शोध घेण्यात अनैतिक मानवी वाहतूक कक्षाला यश आले आहे.
अपहरणाच्या दाखल गुन्ह्यात तपासादरम्यान असे निदर्शनास आले आहे की, यातील 13 ते 18 वर्षे वयोगटाच्या बऱ्याच अल्पवयीन मुलींना फूस लावून ओळखीच्या व्यक्ती घरातून घेऊन निघून गेल्या. सदर मुलींचे देह व्यापार, शरीर विक्री अंमली पदार्थ किंवा गुन्हेगारांच्या टोळीत सहभागी होवू नये यासाठी अनैतिक मानवी वाहतूक व्यापार कक्षाकडून सदर मुलींचा लवकरात लवकर शोध घेवून त्यांना त्यांच्या पालकांचा ताब्यात देण्यात येत असते.
नंदुरबार जिल्ह्यात अल्पवयीन मुलीचे अपहरण व बेपत्ता झालेल्या महिलांचा शोध घेण्यासाठी संपूर्ण पोलीस यंत्रणा सतर्क करण्यात आली आहे. सदर अल्पवयीन मुलींचे व महिलांचे तस्करी होवू नये व लवकरात लवकर त्यांचा शोध लागावा यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालय येथे विशेष Anti | Human Traffiking Unit ची स्थापना करण्यात आली आहे. बेपत्ता महिला व अल्पवयीन मुली यांचा शोध घेण्यासाठी नंदुरबार जिल्हा पोलीस नेहमी प्रथम प्राधान्य देवून काम करीत आहे. गुन्हे तपासाबरोबरच अल्पवयीन मुली, महिला यांचा शोध घेण्याकरीता सचोटीने प्रयत्न करणे बाबत निर्देश देण्यात आले आहेत.
– श्री. पी. आर. पाटील,
जिल्हा पोलीस अधीक्षक, नंदुरबार