नंदुरबार : तळोदा तालुक्यातील बोरद येथील आरोग्यवर्धनी केंद्राच्या नूतन इमारतीचे तसेच प्रतापपूर येथील नुतन आरोग्यवर्धिनी केंद्राचे उद्घाटन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. के. सी. पाडवी यांच्या हस्ते पार पडले. अनुक्रमे 1 कोटी 81 लाख रुपये आणि 2 कोटी 14 लाख रुपये खर्चून उभारलेल्या या आरोग्य केंद्रांमुळे आदिवासी भागातील 50 हून अधिक गावांना तातडीची आरोग्यसेवा उपलब्ध होईल असा विश्वास याप्रसंगी व्यक्त करण्यात आला.
जिल्ह्यातील नागरिकांचे आरोग्य सुदृढ रहावे, याकरीता त्यांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करण्यास आपले प्राधान्य असल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. के. सी. पाडवी यांनी याप्रसंगी केले. जि.प.अध्यक्षा ॲड. सीमा वळवी, आमदार राजेश पाडवी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील, माजी मंत्री पद्माकर वळवी, समाजकल्याण सभापती रतनदादा पाडवी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र चव्हाण, तहसिलदार गिरीष वखारे, जिल्हा साथरोग अधिकारी एन. एल. बावा, पंचायत समिती उपसभापती लता वळवी, जि.प. सदस्य सुहास नाईक, हेमलता शितोळे, सुनिता पवार, संगीता वळवी आदी उपस्थित होते.
ॲड.पाडवी म्हणाले, प्रतापपूर उपकेंद्रास आजूबाजूची 45 गावे जोडलेली असल्याने या आरोग्यवर्धंनी केंद्राचा परिसरातील 48 हजार नागरिकांना लाभ होणार आहेत. या परिसरातील नागरिकांना आरोग्य सेवा देणारी हे सर्वात मोठे आरोग्यवर्धंनी केंद्र आहे. या आरोग्यवर्धंनी केंद्रामुळे या गावांमधील नागरिकांना चांगल्या आरोग्याच्या चांगल्या सोईसुविधा उपलब्ध होतील, असे सांगून पालकमंत्री पुढे म्हणाले की, परिसरातील नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध करण्यासाठी तसेच आरोग्य यंत्रणेच्या बळकटीकरणासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. गेल्या दोन वर्षांपासून जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेचे बळकटीकरण करण्यात येत आहे. कोरोना काळातही जिल्ह्यात चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्यात. नागरिकांनी या सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.
जि.प.अध्यक्षा श्रीमती वळवी म्हणाल्या, या भागातील नागरिकांच्या उपचारासाठी सुसज्ज अशी इमारत निर्माण केली असून नागरिकांना येथे चांगल्या आरोग्य सुविधा मिळेल. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केंद्रातील सुविधांचा नागरिकांसाठी क्षमतेने उपयोग करावा. प्रत्येकांने आपल्यावर सोपविलेली जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडावी.
आमदार राजेश पाडवी म्हणाले की, नूतन इमारतीमुळे नागरिकांना चांगल्या सुविधा उपलब्ध होतील. ग्रामीण भागातील जनतेला वेळेवर आरोग्य सुविधा देण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र महत्वाचे आहे. येथील कर्मचाऱ्यांनी नागरिकांना चांगल्या सुविधा द्याव्यात.
राष्ट्रीय आरोग्य अभियानातंर्गत हे प्राथमिक आरोग्यवर्धनी केंद्र उभारण्यात आले असून बोरद येथील केंद्रावर 1 कोटी 81 लाख रुपये खर्च करण्यात आले आहे. पॅथॉलॉजी लॅब, प्रसूतीगृह, शस्त्रक्रीया कक्ष, औषध भांडार आदी सुविधा येथे उपलब्ध असतील, अशी माहिती डॉ.चव्हाण यांनी यावेळी दिली.
प्रारंभी पालकमंत्र्यांसह मान्यवरांच्या हस्ते कोनशिलाचे अनावरण करण्यात आले. त्यानंतर पालकमंत्र्यांनी आरोग्यवर्धनी केन्द्रातील विविध कक्षात जावून तेथील सुविधांची माहिती जाणून घेतली. यावेळी लोकप्रतिनिधींसह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्ह्यातील जनतेला चांगल्या आरोग्य सुविधा देण्यासाठी जास्तीत जास्त निधी जिल्ह्यास देण्यात येत असून त्यातून दर्जेदार कामे करण्यात यावीत. दुर्गम भागातील नागरिकांना उपचारासाठी तालुक्याच्या ठिकाणी यावे लागते त्यामुळे आरोग्य विभागाने याठिकाणी विशेष शिबीराचे आयोजन करण्याची सुचना केली. या आरोग्यवर्धंनी केंद्राच्या वाढीव बांधकामासाठी 1 कोटी रूपयांचा निधी देण्यात येईल, त्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. तसेच रुग्णांना उपचारास नेण्याकरीता या आरोग्य केंद्रास एक रूग्णवाहिका देण्याबाबतही आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी यंत्रणेला दिल्या.
राष्ट्रीय आरोग्य अभियानातंर्गत हे प्राथमिक आरोग्यवर्धनी केंद्र उभारण्यात आले असून त्यावर 2 कोटी 14 लाख रुपये खर्च करण्यात आले आहे. याठिकाणी पॅथॉलॉजी लॅब, प्रसूतीगृह, शस्त्रक्रीया कक्ष, रेकार्ड रुम, पुरुष महिला कक्ष, औषध भांडार आदी सुविधा येथे उपलब्ध असतील, अशी माहिती डॉ. चव्हाण यांनी यावेळी दिली. यावेळी परिसरातील नागरिक तसेच लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0000