नंदुरबार – धावत्या जयपुर मुंबई एक्सप्रेसमध्ये आज पहाटे झालेल्या गोळीबाराच्या घटनेत तीन प्रवासी आणि एक आरपीएफ अधिकारी मरण पावला आहे. दरम्यान त्या घटनेचे पडसाद उमटू नये म्हणून सर्व रेल्वे स्थानकांना अलर्ट करण्यात आले असून नंदुरबार रेल्वे मार्गावरील आर पी एफ जवान देखील अलर्ट झाले आहेत.
जयपुर मुंबई एक्सप्रेस धावत असताना बी फाईव क्रमांकाच्या डब्यात आज सोमवार दिनांक 31 जुलै 2023 रोजी पहाटे पालघर च्या दरम्यान ही गोळीबाराची घटना घडली. या घटनेला आरपीएफ जवान आणि प्रवाशांमधील वादाची पार्श्वभूमी असल्याचे समजते. तथापि गोळीबार नेमका कोणाकडून कशासाठी झाला हा नेमका प्रकार काय घडला याचा उलगडा अद्याप झालेला नाही. परंतु कोणतीही अफवा पसरवली जाऊ नये आणि अनुचित प्रकार घडवला जाऊ नये या दृष्टिकोनातून सर्व स्तरीय सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत.
नंदुरबार रेल्वे मार्गावर वारंवार चेन पुलिंग
दरम्यान, वारंवार चेन पुलिंग करून रेल्वेगाड्या थांबवून खोळंबा करण्याच्या घटना चार दिवसापासून घडत असल्याबद्दल रेल्वे प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे. काही प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार भुसावळ-सुरत रेल्वे मार्गावर अमळनेर, नंदुरबार आणि अन्य स्थानकादरम्यान खोडसाळपणा करीत साखळी ओढून रेल्वे थांबविण्याच्या अनेक घटना घडविल्या गेल्या. रेल्वे डब्यातील अन्य प्रवाशांना त्रास होत असल्याचे लक्षात न घेता विशिष्ट जमावाकडून घोषणा देत गोंधळ केला गेला आणि त्यामुळे मोठा अनाहूत प्रसंग घडण्याची भीती निर्माण झाली होती, असे त्या प्रवाशांचे म्हणणे आहे. रेल्वे प्रवाशांच्या सहनशीलतेचा अंत पाहणाऱ्या त्या समाजकंटकांना आवर घालायला रेल्वे प्रशासनाकडून कोणतेही प्रयत्न होत नसल्याचे सांगत अनेक प्रवाशांनी संताप व्यक्त केला. तथापि अमळनेर रेल्वे स्थानकादरम्यान अर्धा पाऊण तास रेल्वे गाडी थांबवून गोंधळ करणाऱ्या अशा पाच जणांविरुद्ध आरपीएफ जवानांनी कारवाई केल्याचे समजते.