ब्रेकिंग! नंदुरबारमध्ये धाडसत्र सुरू; भर थंडीत बड्या व्यवसायिकांना फुटला घाम

 

नंदुरबार –  आज सकाळी सकाळी पडलेल्या धाडीमुळे नंदुरबार चांगलेच हादरले आहे. वेगवेगळ्या पथकांनी अचानक नंदुरबार शहरातील काही व्यापाऱ्यांकडे छापेमारी करून झाडाझडती घेणे सुरू केल्याने भर थंडीत काही जणांना घाम फुटला. आयकर विभागाच्या पथकांनी ही कारवाई केल्याचे म्हटले जाते. तथापि पथकांविषयीची अधिकृत माहिती कोणत्याही स्तरावरून देण्यात आलेले नाही. अथवा त्याला पुष्टी मिळालेली नाही.

आज सकाळीच नंदुरबार शहरातील 12 नामांकित व्यक्तींकडे व त्यांच्या आस्थापनांमध्ये तपासणी सुरू असल्याचे आढळून आले. अधिकाऱ्यांचे पथक अशा तऱ्हेने धडकलेले पाहून अनेकांचे धाबे दणाणले. पसरलेल्या या वार्तेमुळे नंदुरबार मधील बडे व्यावसायिक चांगलेच हादरले आहेत. कोणा कोणाकडे तपासणी होत आहे याची माहिती घेण्यासाठी धावाधाव करणारे कार्यकर्ते दिसून आले.

सध्या आयकर विभागाने उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, कर्नाटक असे क्रमाने विविध राज्यात छापेमारी करीत अब्जावधी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता हुडकून काढणेे चालू ठेवलेे आहे. मागील दोन महिन्यात अवैध व्यवहार, बेकायदेशीर खरेदी-विक्री, बनावट कर्ज प्रकरणे, बनावट कागदपत्रांच्या आधारे केलेल्या विवध ट्रस्टच्या माध्यमातून घोटाळे याच्याशी संबंधित व्यवहार उघड केले जात आहेत. केंद्रीय पथकांनी सुरू ठेवलेल्या या मोहिमेचा देशस्तरावरील काही बड्या ग्रुपला तसेच बड्या नेत्यांना फटका बसला.
अशातच महाराष्ट्रातील दुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नंदुरबार जिल्ह्याकडे या पथकांनी अचानक वक्री नजर वळवल्याविषयी आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अर्थात हे पथक केंद्रातील आहे की राज्य स्तरावरील आहे याची स्पष्टता अधिकृतपणे झालेली नाही. परंतु कागदपत्रांची नोंदींची व दप्तराची झाडाझडती घेतली जात असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!