नंदुरबार (येगेंद्र जोशी) – नवापुर तालुक्यातील गुजरात सीमेला लागून असलेल्या लक्कडकोट गावात स्विफ्ट कार मधून अचानक आलेल्या दोन जणांनी गोळीबार करीत हल्ला केल्याची फिर्याद एका तरुणाने दिल्यामुळे खळबळ उडाली आहे. परंतु घटनास्थळी आढळून आलेल्या दोन्ही गोळ्या जिवंत असून प्रत्यक्षात फायर झालेला नाही असे पोलिसांना आढळून आल्यामुळे या प्रकरणाचे गूढ वाढले आहे.
अधिक माहिती अशी की नवापूर तालुक्यात गुजरात हद्दीलगत लक्कडकोट गाव आहे. सीमेलगतचा हा परिसर अवैध धंद्यांच्या संदर्भाने सातत्याने चर्चेत असतो. या भागातून चालणारी मद्य तस्करी, लाकूड तस्करी, मोठे जुगार आणि तत्सम अनेक अवैध धंद्यामुळे हा आंतरराज्यीय अड्डा म्हणूनच गणला जातो. अशा या लक्कडकोट गावातील प्रवीण गावित नामक युवकावर गोळीबार केल्याची कथित घटना रात्री घडली. त्याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार सोमवारी रात्री साडेआठ वाजता प्रवीण गावित हा प्रवीण चिकन सेंटर या दुकानावर बसलेला होता. त्याप्रसंगी गुजरात कडून आलेली जी जे 5 – 3215 क्रमांकाची स्विफ्टकार चिकन सेंटर पासून काही अंतरावर थांबली. काळे जॅकेट आणि टोपी परिधान केलेले दोन जण काही मिनिट घुटमळले. नंतर त्यातील एकाने प्रवीणच्या जवळ येऊन पार्सल आहे का? अशी विचारणा केली. चिकनचे पार्सल नाही, असे प्रवीण आणि उत्तर दिल्यावर तो व्यक्ती कार जवळ गेला. लगेच परतून हातातील पिस्तूलातून त्याने पहिली गोळी झाडली. त्यामुळे किरकोळ जखम होऊन प्रवीण खुर्चीतून खाली पडला. मारून फेकण्यासाठी प्रवीणने खुर्ची उचलली तोपर्यंत त्याने दुसरी गोळी झाडली आणि कार मध्ये बसून वेगाने भोकरवाडा, किरणपुराच्या दिशेने पसार झाले; असा घटनाक्रम पोलिसांना कथन करण्यात आला. घटना समजताच रात्री जिल्हा पोलीस अधीक्षक प्रवीण पाटील यांनी तातडीने गुजरात सीमेवरील नाका-बंदी करण्याचे आदेश दिले व मोठ्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. अतिरिक्त अधीक्षक विजय पवार, उपअधीक्षक सचिन हिरे, स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे निरीक्षक रवींद्र कळमकर, नवापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक भापकर यांनी आपापल्या पद्धतीने तपासणी सुरू केली.
तथापि “एनडीबी न्यूज वर्ल्ड”ला प्राप्त माहितीनुसार पोलिसांना घटनास्थळी दोन गोळ्या पडलेल्या आढळून आल्या. पण त्या दोन्ही गोळ्या जिवंत असून फायर झालेल्या नाहीत, असेही त्यांना आढळून आले. मग झाडल्या गेलेल्या गोळ्यांच्या व्यतिरिक्त या दोन गोळ्या जिवंत पडल्या असाव्यात का? याचा शोध घेतला जात आहे. दरम्यान हल्लेखोरांनी गोळ्या झाडायचा प्रयत्न केला परंतु मिस फायर झाले असावे व त्यामुळे पुढचा अनर्थ टळला असावा; असा याचा एक अर्थ काढला जात आहे. प्रवीण याला झालेल्या किरकोळ जखमा गोळीबारातून झालेल्या नसाव्यात; असाही संदर्भ पुढे येत आहे. यामुळे हल्ल्याची घटना कोणत्या कारणाने घडली? हल्लेखोरांनी नेमके कशाचे पार्सल मागितले? हल्लेखोर गुजरातचेच असावेत का? झाडलेल्या गोळ्यांचा धमाका झाला की नाही ? गोळ्या झाडल्या जाण्याची प्रक्रिया घडलेलीच नाही, तर या प्रकरणाचे गांभीर्य आणखी काय असू शकते? अशा अनेक अंगाने तपासकार्य सुरू झाले आहे.