नंदुरबार – शहादा शहरात एका संशयिताची धरपकड केल्यानंतर बनावट नोटा त्याच्याकडे असल्याचे आढळून आले. शहादा शहरातील बाजारपेठेत यामुळे खळबळ उडाली आहे. बनावट नोटा जिल्ह्यातील कोणकोणत्या भागात वापरात आल्या याचा शोध आता स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पथक घेत आहे.
जिल्ह्यातील शहादा शहरात बनावट भारतीय चलनी नोटा मिळून आल्याने खळबळ उडाली आहे. या गुन्ह्यात आणखी काही आरोपी आहेत काय? याचा शोध सुरु असून या रॅकेटच्या मुळापर्यंत पोलीस जातील असे मा. पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी सांगितले.
यासंदर्भात पोलीस अधीक्षक कार्यालयाने दिलेली माहिती अशी की शहादा शहरातील गरीब नवाज कॉलनीत राहणारा एक इसम बनावट भारतीय चलनी नोटा घेवून सोने खरेदी करण्यासाठी जाणार आहे, अशी गुप्त बातमी पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांना दिनांक 09/02/2022 रोजी मिळाली होती. म्हणून त्यांनी तात्काळ ही माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना पुढील कायदेशीर कारवाई करणेबाबत सूचना दिल्या.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे तात्काळ एक पथक तयार केले. पथकाने गरीब नवाज कॉलनी, शहादा येथे माहिती काढली असता सदर इसम बनावट नोटा घेवून सोने खरेदी करण्यासाठी गेल्याचे त्यांना समजले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने लगेच शहादा शहरातील सर्व सराफ दुकानांवर जावून तपास केला. त्याच दरम्यान 12.15 वाजेच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सराफ बाजारात फिरत असतांना एक इसम संशयास्पद हालचाली करतांना दिसून आला म्हणून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला ताब्यात घेवून त्याचे नांव गांव विचारले असता त्याने त्याचे नांव नाजीम रहिम बागवान वय 32 रा. गरिब नवाज कॉलनी, शहादा असे सांगितले. त्याची झडती घेतली असता त्याच्या पॅन्टच्या खिशात 100 रूपये दराच्या एकूण 110 बनावट भारतीय चलनी नोटा मिळून आल्या. पथकाने ताबडतोब त्यास ताव्यात घेवून त्याचे विरुध्द् शहादा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री.पी. आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. रविंद्र कळमकर, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, श्री. संदीप पाटील, सहा. पोलीस निरीक्षक, पोलीस हवालदार/दीपक गोरे, पोलीस नाईका विकास कापुरे, पुरुषोत्तम सोनार, गोपाल चौधरी, मोहन ढमढेरे, पोलीस शिपाई यशोदिप ओगले, किरण मोरे, विजय ढिवरे, रामेश्वर चव्हाण यांचे पथकाने केली असून मा. पोलीस अधीक्षक श्री.पी.आर.पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचे अभिनंदन केले आहे.