ब्रेकिंग : मुख्याधिकारी यांच्यावर धावून गेलेल्या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल; चार जणांना अटक

नंदुरबार – अतिक्रमण हटावमुळे चर्चेत आलेले व धाडसी आयएएस अधिकारी अशी प्रतिमा बनलेले पुलकित सिंह यांना बांधकाम तोडण्यापासून रोखण्यासाठी घेराव घातल्या प्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे.  यातील चार जणांना अटक करण्यात आली आहे.
शहरातील वाहतूक अडवणाऱ्या शासकीय बांधकामाला आधी हटवण्यात यावे ; अशा सूचना राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा नंदुरबार जिल्हा पालकमंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी काल नंदुरबार नगर परिषदेतील आढावा बैठकीत दिल्या आणि लागोलाग आज 5 मे 2023 रोजी त्यावर नंदुरबार नगर परिषदेचे विद्यमान मुख्याधिकारी पुलकित सिंह यांनी  त्वरित अंमलबजावणी केली.
नगरपरिषदेतील अन्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मागमूस लागू न देता मुख्याधिकारी पुलकित सिंह यांनी नंदुरबार शहरातील करण चौफुली,  धुळे चौफुली तसेच नवापूर चौफुली येथे एकाच वेळी वेगवेगळे जेसीबी पथक पाठवून कारवाई केली.  नवापूर चौफुली वरील इंदिरा स्मारक म्हणून ओळखले जाणारे सुशोभीकरण तसेच धुळे चौफुली वरील गजलक्ष्मी च्या स्वरूपातील सुशोभित सर्कल आणि करण चौफुलीवरील अशोक चक्र लावलेले सुशोभीकरण तोडले जात असल्याचे पाहून नागरिकांना आश्चर्याचा धक्का बसला. हे सर्व सर्कल आकर्षण बिंदू मनले जात होता. परंतु या चौफुलीवरुन होणारी वाहतूक आणि जड वाहने यांना त्याचा प्रचंड अडथळा होत होता. ते लक्षात घेऊन या  सुशोभीकरणाचे रस्ते व्यापणारे बांधकाम फक्त तोडण्यात आले.  त्यांचा आकार लहान करणे आणि वाहतुकीला रस्ता मोकळा करणे हा या बांधकाम तोडण्यामागील हेतू असल्याचे नगरपालिकेच्या वतीने सांगण्यात आले.
 करण चौफुलीवरील सर्कलवर अशोक चक्र लावण्यात आलेले आहे. ते तसेच ठेवून पायथ्याचे सर्कल कमी करण्यासाठी तोड काम चालू होते. शहरातील रिपब्लिकन कार्यकर्त्यांना त्याविषयी विशेष आदर आणि आकर्षण आहे. परंतु नगरपालिकेचे पथक त्या चक्रासह बांधकाम तोडत असल्याचा गैरसमज निर्माण झाला आणि स्थानिक काही जणांनी विरोध सुरू केला. अशातच, पथकाची कार्यवाही पाहण्यासाठी तिथे  मुख्याधिकारी पुलकित सिंह करण चौफुलीवर पोहोचले. त्यावेळी यातील काही संताप्त कार्यकर्त्यांनी त्यांना घेराव घालण्याचा प्रयत्न केला. अधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यात वाद होऊन तो शहर पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला. आयएएस दर्जाच्या अधिकाऱ्याला अशा तऱ्हेने धाकात घेणे योग्य नाही अशा प्रतिक्रिया उमटल्या.
 मुख्याधिकारी यांनी कारवाईची मागणी करीत फिर्याद दिली. शहर पोलीस ठाण्यात संघटनांचे काही पदाधिकारी येऊन दाखल झाले. तथापि शहर पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी उत्तम मध्यस्थी करून प्रशासनात व कार्यकर्त्यांमध्ये सलोखा राहील अशा पद्धतीने प्रकरण हाताळले. अखेरीस घेराव घालण्याचा प्रयत्न करणे तसेच शासकीय कामात अडथळा निर्माण करणे आदी कलमां खाली 6 जणांविरुद्ध सायंकाळी उशिरा गुन्हा नोंदवण्यात आला. याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली असून अन्य दोन जणांचा शोध घेतला जात आहे अशी माहिती शहर पोलीस ठाण्यातून देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!