भरकटलेल्या तरुणांना अंधाराच्या गर्तेतेत लोटणारा निर्णय

वाचकांचे पत्र:

भरकटलेल्या तरुणांना अंधाराच्या गर्तेतेत लोटणारा निर्णय

सुपर मार्केट व किराणा दुकानांमध्ये वाईन विक्री करता येईल हा महाराष्ट्र सरकारचा निर्णय वाचला व आजच्या तरुणाई विषयी जरा जास्तच चिंता वाटू लागली. आज नकारात्मक होऊन नैराश्याकडे वळलेले, आत्महत्या करण्याच्या मानसिकतेत असलेले किती तरी तरून सकरात्मक आधाराचा हात शोधत आहेत व अशा स्थितीत हा निर्णय अजूनच त्यांना भरकटवेल असे वाटते. आजची तरुणाई हुशार तंत्रज्ञानामुळे एका जागी बसून विविध कामे करणारी व प्रगत विचारांची म्हणून आम्ही ओळखतो परंतु याचीच दुसरी बाजू म्हणजेच या तंत्रज्ञानाच्या अतिवापरामुळे बुद्धिचा वापर कमी झाला की काय असा प्रश्न पडतो. त्यात एका जागी बसून विविध कामे तंत्रज्ञानाच्या सहाय्यामुळे करणारी तरुणाई शारीरिक दृष्ट्या कुठेतरी असक्षम व आळशी होत चाललेली ही दिसून येते. गेल्या दोन वर्षापासून तर महाविद्यालयीन तरूणांची अवस्था खूपच बिकट झाली आहे. ऑनलाइन शिक्षण प्रणालीमुळे शैक्षणिक संकल्पना पूर्णतः अवगत होत नाहीत. शिक्षणात तर अडचणी आहेतच परंतु हॉस्टेल बंद झाल्यामुळे कित्येक तरुणांना गावाकडे जावे लागले. काही वर्षात शहरातील वातावरण व स्मार्टफोनच्या सवयीमुळे ते आज ग्रामीण भागात राहण्यास तयार नाहीत. शेतातील कामे तर दूरच. कोरोनामुळे उद्भवलेल्या आर्थिक पार्श्वभूमीवर नोकऱ्याही काही प्रमाणात कमी झाल्या आहेत, स्पर्धा परीक्षा व इतर परीक्षा ही विलंबाने होत आहेत या सगळ्यांचा परिणाम म्हणजेच आजची तरुणाई कुठेतरी आधीच नकारात्मक मानसिक स्थितीत आहे. अशावेळी सरकारचा हा निर्णय त्यांची पावले व्यसनाधीनतेकडे सहज घेऊन जाईल व ज्या तरुणाईला आम्ही उद्याचे आधारस्तंभ म्हणतो ती तरुणाई व्यसनी होऊन आई-वडिलांचे स्वप्न कसे पूर्ण करेल. कित्येकदा आपण अनाधिकृत मद्य विक्रीमुळे संसार उघड्यावर येत आहेत म्हणून महिलांचे मोर्चे बघतो आता तर मुलेही सहज त्या गर्तेत ओढली जाणार अशा महिलांनी करायचे काय. पंजाब सारखी युवा पिढीतील व्यसनाधीनता वाढायला महाराष्ट्रात ही वेळ लागणार नाही.

– डॉ०. पी. एस. महाजन, संभाजीनगर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!