नंदुरबार – डंपरच्या धडकेत एका सुहासिनीचा आज वटपौर्णिमेच्या दिवशीच बळी गेल्याची दुर्दैवी घटना घडली. मृत्युमुखी पडलेली विवाहिता गर्भवती असल्याचे सांगण्यात आले यामुळे नागरिकांमधून अधिकच तीव्र संताप व्यक्त होत आहे. भरधाव वेगाने धावणारे डंपर लोकांच्या जीवावर उठले असताना अधिकारी त्यांचा बंदोबस्त करीत नसल्याचे पुन्हा अधोरेखित झाले.
नंदुरबार शहरातील वळण रस्त्यावर डंपर खाली चिरडले जाऊन मृत्यूमुखी पडण्याची अवघ्या काही दिवसांच्या अंतराने घडलेली ही तिसरी घटना आहे. दोन महिन्यापूर्वी धुळे चौफुलीवर डंपरच्या खाली चिरडली जाऊन शाळकरी विद्यार्थिनी जागीच मरण पावली होती. त्यानंतर लगेचच शहादा वळण रस्त्यावर करंण चौफुली लगत तरुण छायाचित्रकाराचा डंपर खाली चिरडला जाऊन मृत्यू झाला होता. आता दोन महिने होत नाही तोवरच ही तिसरी घटना घडली आहे.
आजच्या या अपघाताविषयी अधिक माहिती अशी की, आज दिनांक 21 जून 2024 शुक्रवार रोजी नंदुरबार शहरा लागत असलेल्या होळ तर्फे हवेली गावातील प्रकाश पाडवी हा इसम पत्नी कवा पाडवी सोबत किराणा खरेदीसाठी आपली दुचाकी क्रमांक एम एच 39 एच 3116 वर जात होता. दुपारी 12.30 वाजेच्या दरम्यान हे दोन्ही पती-पत्नी मोटरसायकलने जात असताना करण चौफुली जवळ भरधाव वेगात जाणाऱ्या डंपरची (क्रमांक एम एच 46 बी एफ 9066) त्यांना जोरदार धडक बसली. त्या धडकेत दुचाकीचा तोल गेल्याने कवा पाडवी ही गर्भवती महिला डंपरच्या चाकाखाली दाबली गेली आणि तिचा जागीच मृत्यू झाला, तर पती प्रकाश पाडवी हे दुचाकीवरून बाजूला फेकले गेल्याने गंभीर जखमी झाले. अपघात स्थळी बघ्यांची एकच गर्दी जमा झाली. घटना कळताच अपघातस्थळी उपप्रादेशिक परिवहन विभागाचे तसेच नंदुरबार शहर वाहतूक शाखेचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित झाले. 108 रुग्णवाहिकेतून जखमी प्रकाश पाडवी यांना अधिक उपचारासाठी दाखल करण्यात आले. मृत कवा पाडवी यांचे शव देखील रुग्णवाहिकेतून शवविच्छेदनाकरिता जिल्हा रुग्णालयात पोहोचविण्यात आले. घटनेची माहिती कळताच होळतर्फे हवेली गावातील ग्रामस्थांनी व मृत महिलेचे नातेवाईक यांनी घटनास्थळी गर्दी केली. दरम्यान, अपघात करून पळालेल्या डंपरला पकडून शहर पोलीस स्टेशनला जमा करण्यात आले डंपर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.