नंदुरबार – भारतीय जनता पक्षाच्या नंदुरबार जिल्हाध्यक्षपदी अखेर नीलेश श्रीराम माळी यांची निवड झाली आहे. भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही नियुक्ती घोषित केली. वरिष्ठ स्तरावरील घडामोडींमुळे महाराष्ट्रातील बहुतांश पदांची निवड रखडली होती. जिल्हा भाजपातील गटातटाचे संदर्भ देखील सांगितले जात होते.
अनेक महिन्यांपासून भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष पद कोणाला दिले जाणार याविषयीची उत्सुकता टांगणीला होती. जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांमध्ये जिल्हाध्यक्ष पद मिळाविण्यासाठी स्पर्धा होती. शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष पद सोडून भाजपात आलेले डॉक्टर विक्रांत मोरे यांचे नाव मागील वर्षभर चर्चेत राहिले. हिंदू प्रेमी चेहरा आणि धडाकेबाज कार्यपद्धती यामुळे विक्रांत मोरे यांना भाजपकडून संधी दिली जाईल अशी अपेक्षा त्यांच्या कार्यकर्त्यांना होती. परंतु प्रत्यक्षात तसला निर्णय झाला नाही. नंतर भाजपाचे जिल्हा सरचिटणीस निलेश माळी यांचे नाव अध्यक्ष पदासाठी पुढे आले. तथापि अलीकडच्या काही महिन्यात जिल्हाध्यक्ष पदासाठी इच्छुक असलेल्यांमध्ये नवापूर तालुक्यातील आर एस एस चे जुने ज्येष्ठ कार्यकर्ते राजेश गावित, तळोदा तालुक्यातील शाम राजपूत अशीही काही नावे चर्चेत आली. अखेर जिल्हा भाजपातील गटातटाचे संदर्भ लक्षात घेऊन ओबीसी आणि खुल्या वर्गातील प्रतिनिधित्व करू शकणारा तसेच पक्षासाठी योगदान असलेला चेहरा म्हणून निलेश माळी यांच्या नावावर शिक्का मोर्तब करण्यात आले.
भारतीय जनता पार्टीत प्रत्येक कार्यकर्त्याला संधी दिली जाते, हे आज पर्यंतच्या राष्ट्रीय तसेच राज्यस्तरावरील नियुक्त्यांच्या उदाहरणांमधून पाहायला मिळाले होते. तळागाळातील कार्यकर्त्यांना समवेत घेऊन चालणारा हा एकमेव पक्ष आहे, हे मला जिल्हाध्यक्षपदाची संधी दिल्यामुळे आणखी स्पष्ट झाले. भाजपाचे संघटन मजबूत करण्यासाठी प्रामुख्याने काम करण्याचे माझे उद्दिष्ट असून सर्वांना समावेश घेऊन वाटचाल करू, अशा शब्दात निलेश माळी यांनी एनडीबी न्यूज वर्ल्ड शी बोलताना निवडीबद्दल आनंद व्यक्त केला व सर्व वरिष्ठांचे, जिल्ह्यातील समस्त पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे आभार मानले.
नीलेश माळी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे निष्ठावंत आहेत. तसेच पक्षाचे सक्रिय पदाधिकारी आहेत. प्रत्येक बैठकीला हजेरी लावणे, पक्षाच्या ध्येय धोरणाप्रमाणे काम करणे तसेच पक्षाशी एकनिष्ठता हे त्यांच्या नियुक्ती मागील कारण असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले. मावळते जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांच्याकडे प्रदेश महामंत्रिपद आल्यानंतर दोन्ही पदे त्यांच्याकडे होती.