भाजपाच्या फलकबाजीमुळे नगरपालिकेचा प्रशासकीय कारभार पुन्हा चव्हाट्यावर

नंदुरबार – शहरात मोकाट जनावरांमुळे एका व्यापाऱ्याला नाहक प्राण गमवावे लागले. त्यामुळे नागरिकांमधून संतप्त भावना व्यक्त होत असतानाच राजकीय पडसाद देखील उमटणे सुरु झाले आहे. आणखी किती बळी घेणार ? असा जाहीर प्रश्न विचारणारे फलक शहराच्या विविध भागात भारतीय जनता पार्टीने लावल्यामुळे नगरपालिकेचा प्रशासकीय कारभारही चर्चेत आला आहे.

      मोकाट जनावरांमुळे होणारे मृत्यू आणि त्यांची दहशत थांबवणार कधी? डेंग्यूसदृश आजार  फैलावणारे अनारोग्य संपवणार कधी? कुत्र्यांमुळे मरणारे जीव वाचवणार कधी? असे प्रश्न जाहीरपणे या फलकावर विचारण्यात आले आहेत. शहराच्या विविध भागात हे फलक लावण्यात आले आहेत.
अनेक ठिकाणी झळकलेत हे बॅनर
 मोकाट जनावरे रस्ता अडवून बसतात त्याचबरोबर भर बाजारात धुडगूस घालतात. मागील तीन-चार वर्षात ही समस्या अधिक उग्र बनली आहे. मोकाट जनावरे तोंड घालत असल्यामुळे तसेच अचानक धावत येऊन धडक देत असल्यामुळे लॉरीवर अथवा बाजारात बसून विक्री करणाऱ्यांना अनेकदा आर्थिक फटका सहन करावा लागतो. या मोकाट गुराढोरांना पकडून नगरपालिकेने कडक कारवाई करावी तसेच त्यांना बंदिस्त करण्याची कायमची सोय करावी; अशा मागण्या वैतागलेल्या नागरिकांनी अनेकदा केली. त्याचबरोबर भाजपाच्या नगरसेवकांनी सुद्धा सभागृहात विषय मांडले. तथापि उपाय होत नसल्यामुळे नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर सातत्याने रोष व्यक्त केला जात आहे. अशातच जनावरांची झुंज चालू असताना धडक बसून एका व्यापाऱ्याला प्राण गमवावे लागले. दरम्यान, यासंदर्भात भारतीय जनता पार्टीचे विरोधी गटनेते चारुदत्त कळवणकर, नगरसेवक प्रशांत चौधरी यांनी आपली प्रतिक्रिया देताना सांगितले की, नगरपालिकेच्या व्यवस्थापनाचा गलिच्छ कारभार याला जबाबदार असून यावर संतप्त प्रतिक्रिया बाजारपेठेत उमटली आहे. भटक्या कुत्र्यांचा उच्छाद सुद्धा असाच त्रासदायक बनला आहे. किती बळी गेले हे नगरपालिकेलाही माहित आहे. कोणत्याही वसाहतीत औषध फवारणीी करायची नाही, कीटकनाशक टाकायचे नाही, नियमित स्वच्छता करायची नाही हे जणू नगरपालिकेने ठरवून घेतले आहे. परिणामी शहरात डेंग्यूसदृश साथ चालू आहे अनेकांचा बळी जात आहे. निगरगट्ट नगरपालिका प्रशासनाला म्हणूनच जाहीर प्रश्न विचारावाा लागला; असेही ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!