मुंबई – भारतात दोन प्रकारचे जिहाद असून एक ‘हार्ड जिहाद’ असून त्यात बाँबस्फोट, आतंकवादी कारवाया येतात, तर दुसरा ‘सॉफ्ट जिहाद’ आहे. त्यात ‘हलाल अर्थव्यवस्था’, ‘लँड जिहाद’, ‘लव्ह जिहाद’ आणि ‘नार्कोटिक जिहाद’ (अंमली पदार्थ जिहाद) येतो. रक्त न सांडता आणि बंदूकीची गोळी वाया न घालवता भारताला कमकुवत करण्यासाठी ‘नार्कोटिक जिहाद’चा वापर केला जात आहे. भारतातील युवा पिढीला कमकुवत करून भारताला उध्वस्त करण्याचे पाकिस्तानचे षड्यंत्र आहे. पाकचा अंमली पदार्थ विक्रेता रमझान याला पकडल्यावर त्याने तशी जाहीर कबुली दिली आहे, असे प्रतिपादन कर्नाटकातील प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि उद्योजक प्रशांत संबरगी यांनी केले.
हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांनी प्रसिद्धीसाठी दिलेल्या पत्रकातून ही माहिती दिली असून पुढे म्हटले आहे की, हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘भारतात नार्कोटिक जिहाद ?’ या विषयावर आयोजित ऑनलाइन विशेष संवादात ते बोलत होते. या वेळी बोलतांना प्रशांत संबरगी पुढे म्हणाले की, आता पंजाब नंतर केरळला ‘नार्कोटिक जिहाद’चे केंद्र बनवत आहेत. केरळमध्ये पूर्वी 500 पर्यंत असणार्या अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांचे प्रमाण वर्ष 2016 नंतर 3,500 पर्यंत गेले आहे. केवळ हिंदीच नव्हे, तर कन्नड, तमिळ, तेलगू आदी चित्रपटसृष्टीतील पार्ट्या अंमली पदार्थांशिवाय होतच नाहीत, हे राष्ट्रीय समीकरण आहे. एकूणच सँडलवूडचा (कन्नड चित्रपटसृष्टीचा) अंमली पदार्थांशी संबंध उघड होतो. वर्ष 2019 मध्ये ‘अंमली पदार्थ मुक्त भारत’ या मोहिमेसाठी आम्ही ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’च्या वतीने चित्रपटसृष्टीतील लोकांची आवाहनपर छोटीशी मुलाखत घेण्याचे ठरवले, तेव्हा 70 टक्के लोकांनी त्याला नकार दिला; कारण बहुतांश चित्रपटसृष्टी यात सहभागी आहे. त्यामुळेच आर्यन खानला पाठींबा मिळत आहे.
या वेळी ओडिसाचे माजी अतिरिक्त पोलीस महानिरीक्षक श्री. अरुण कुमार उपाध्याय म्हणाले की, अंमली पदार्थांचा व्यवसाय हा आतंकवाद आणि गुन्हेगारी कारवायांसाठी पैसे कमावण्याचे मोठे माध्यम आहे; मात्र याचा योग्य तपास आणि जलद न्यायनिवाडा होऊन जोपर्यंत शिक्षा होत नाही, तोपर्यंत हे थांबणे कठीण आहे. अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांकडे पोलीस, सीमाशुल्क विभाग, अंमली पदार्थविरोधी पथक हे सर्व पैसे कमवण्याचे माध्यम समजतात. त्यामुळेच अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांच्या 15 सहकार्यांनी केलेल्या आत्महत्या कि हत्या याचा तपास न करता त्यात अंमली पदार्थांच्या दिशेने तपास केला गेला. हिंदु जनजागृती समितीचे दिल्ली राज्याचे प्रवक्ते श्री. नरेंद्र सुर्वे म्हणाले की, चित्रपटसृष्टीच नव्हे, तर सनबर्न फेस्टिव्हलमध्ये गोव्यात नेहा बहुगुणा नावाची युवती आणि अन्य तीन युवकांचा अंमली पदार्थांच्या अतिसेवनाने मृत्यू झाला होता. एकूणच भारतीय युवा पिढीला उध्वस्त केले जात आहे. भारतीय युवांना अंमली पदार्थांपासून वाचवण्यासाठी भारतात हिंदु राष्ट्र स्थापण्याची आवश्यकता आहे.